आगीत कडब्याची गंजी, तुर खाक
शेजार्याच्या सतर्कतेने जीवित हानी टळली
अडीच लाखांचे नुकसान
पाचोड / प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील कडेठाण येथील शेतकरी प्रल्हाद तवार यांच्या शेतात अचानक लागलेल्या आगीत त्यांनी जनावरांसाठी ठेवलेल्या 5 हजार कडब्याच्या पेंड्यांसह 10 क्वींटल तूर जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत जीवीत हानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रल्हाद तवार हे आपल्या कुटुंबासह गट नंबर 254 मध्ये राहतात. रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान शेजारी राहणारे आप्पासाहेब वरकड यांना तवार यांच्या शेतातील गंजीला आग लागलेली दिसली. त्यांनी तवार यांना तात्काळ फोन करून उठवले. त्यामुळे जीवित हानी टळली. तवार यांनी जनावरांसाठी ठेवलेला 5 हजार पेंड्या कडबा आणि 10 क्वींटल तुरीची पेटी आगीत जळून खाक झाली. सध्या या भागात भयान दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. खाण्यासाठी चारा नाही. अशा परिस्थितीत तवार त्यांनी पोटाला चिमटा घेऊन जपून ठेवलेला कडबा व 10 क्विंटल तूरीची पेटी जळून खाक झाली. दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची विहीरही कोरडी ठाक पडली आहे. तिला पाणी असते तर कमीत कमी अर्धा चारा वाचू शकला असता. सध्या जनावरांना टाकण्यासाठी एकही पेंडी शिल्लक राहिली नसल्यामुळे जनावरांना दुष्काळात काय खायला घालायचे हा प्रश्न तवार यांना पडला आहे.
या आगीमुळे तवार यांचे किमान दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी दिलीप मानघरे, पोलीस पाटील नारायणराव तवार यांनी केला आहे. यावेळी भूषण तवार, अनुबाबा तवार, बाळू चौरे, नंदू राठोड आदी उपस्थित होते.