बोरं म्हटलं कि तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. बोर हे एक लालसर पिवळट रंगाचे आंबटगोड चव असलेलं फळ आहे. बोरांची झाडे जास्त उंच नसतात तसेच या झाडांना काटे असतात. यांच्या बीजास ‘आटोळी’ किंवा ‘आठोई’ असे म्हणतात. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ या भागात बोरींची काटेरी झुडपे आढळतात. चवीला रुचकर, पचण्यास हलके अशी ही बोरं मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते, बोरांच्या सेवनाने वात दोष कमी होतो, जुलाब थांबतो, रक्तविकार, श्रम, शोष इत्यादी त्रासातही बोरं हितकारक असतात.
- बोरांपासून चटणी:-
बोरांपासून चटणी तयार करताना किंचित पिवळसर रंगाची निरोगी बोरे निवडून त्यांचा कीस करून घ्यावा. एक किलो बोराच्या किसापासून साधारणतः 1.500 ते 1.750 किलो चटणी तयार होते. बोराचा कीस – 1 किलो, साखर – 1 किलो, मिरची पूड – 20 ग्रॅम, कांदा बारीक वाटलेला – 60 ग्रॅम, मीठ – 50 ग्रॅम, लसूण बारीक वाटलेला – 15 ग्रॅम, वेलदोडे पावडर – 15 ग्रॅम, दालचिनी पावडर – 15 ग्रॅम, व्हिनेगर – 180 मिलि. हे घटक लागतात.
1) बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे. सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडाच्या पुरचुंडीमध्ये बांधून मिश्रणात सोडावेत. अधून-मधून ही पुरचुंडी थोडीशी पळीने दाबावी म्हणजे मसाल्याचा अर्क उतरण्यास मदत होईल.
2) हे मिश्रण 67 ते 69 अंश ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे. त्यात व्हिनेगर मिसळावे. मिश्रण पुन्हा गरम करावे. गरम असतानाच ही तयार झालेली चटणी रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावी. थंड झाल्यावर बाटल्या झाकणाने बंद करून कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
- बोरांपासून लोणचे:-
1) पिकलेल्या बोरांपासून उत्तम प्रकारचे लोणचे तयार करता येते. पाह्ल्यांदा लोणच्यासाठी वापरावयाचे तेल उकळून ते थंड करून घ्या.
2) लोणचे तयार करण्यासाठी बोराच्या फोडी 1.5 किलो, मीठ 250 ग्रॅम, खाद्यतेल 240 ग्रॅम, मेथी (मध्यम भरडलेली) 2.5 ग्रॅम, मोहरी (मध्यम भरडलेली) 100 ग्रॅम, मिरची पूड 50 ग्रॅम, हिंग 50 ग्रॅम, हळद पावडर 25 ग्रॅम, सोडियम बेन्झोएट 0.1 ग्रॅम. हे घटक लागतात.
3) प्रथम फळाचे तुकडे व मीठ सोडून बाकी सर्व पदार्थ तेलात परतून घ्यावेत. मसाला व फळांचे तुकडे एकत्र मिसळून पुन्हा दोन-तीन मिनिटे परतून घेऊन मीठ मिसळावे.
4) तयार झालेले लोणचे निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, हवाबंद करून, झाकण लावून त्या थंड व कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.