बियाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. त्यामध्ये बियाणे तयार झाल्यापासून त्याची विक्री होईपर्यंत वेगवेगळ्या बाबींचा उदाहरणार्थ, परागीभवन होऊन फळधारणा होणे, बियाण्याची वाढ, पक्वता, काढणी, मळणी, वाळवणे, स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग, साठवण व विक्री आदींचा समावेश होतो. ढोबळमानाने या बाबींची खालील चार गटांमध्ये वर्गवारी करता येईल.
1. आनुवंशिक कारणे
बियाण्याची गुणवत्ता ही आनुवंशिक शुद्धतेवर अवलंबून असते. ही शुद्धता आनुवंशिक व भौतिक कारणांमुळे कमी होत जाते. प्रामुख्याने एकच बियाणे वर्षानुवर्षे वापरल्याने त्याची आनुवंशिक शुद्धता कमी होते.
2. हवामानातील बदल (भौगोलिक कारणे)
पिकांची वाढ व बियाण्यांची गुणवत्ता ही फक्त आनुवंशिक कारणांमुळे कमी होत नसते. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. पिकाची वाढ व बियाणे तयार होऊन ते पक्व होताना अनुकूल हवामान असल्यास त्याची गुणवत्ता चांगली राहते. त्याचप्रमाणे हवामानातील वार्याचा वेग, अति पाऊसमान, प्रकाशाची तीव्रता, तापमान फुलोर्यातील काळात कीटकांच्या हालचाली इत्यादी बाबींवर बियाण्याची गुणवत्ता ठरते. या प्रतिकूल बाबी असल्यास त्याचा विपरीत परिणाम बियाण्याच्या गुणवत्तेवर होतो.
3. व्यवस्थापकीय आणि उत्पादन तंत्रज्ञान
प्रसारित केलेल्या उत्पादन तंत्रज्ञानाच्या शिफारसींचा अवलंब करून बीजोत्पादन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रसारित केलेले तंत्रज्ञान हे ठिकाण व हंगाम यानुसार थोडेफार वेगळे असू शकते. उत्पादन तंत्रज्ञानामध्ये आपल्या वैयक्तिक अनुभवाचा उपयोग करून आवश्यकता भासल्यास स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये थोडेफार बदल करून उपयोग करावा. व्यापारी तत्त्वावर घेतल्या जाणार्या पिकांपासून बीजोत्पादनासाठीची पिके वेगळे करून उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यास उच्चतम गुणवत्ता असलेल्या बियाण्याची निर्मिती शक्य आहे. अशा प्रकारे तयार केलेल्या बियाण्याची आनुवंशिक शुद्धता चांगली असते. बियाणे खराब होण्याचा धोका राहत नाही. कीड-रोगरहित बियाणे तयार करता येते.
बीजोत्पादनासाठी लागणारे मूळ बियाणे विलगीकरण अंतर, पीकसंरक्षण जमीन तयार करणे, पेरणीची वेळ आणि पद्धत, तणनियंत्रण, भेसळीची झाडे काढणे, रोगग्रस्त झाडे काढणे, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग व किडीचे नियंत्रण याबाबी बियाण्याच्या गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
4. बियाण्याची काढणी व काढणीपश्चात तंत्रज्ञान
बियाण्याची उच्च गुणवत्तेचे बियाणे प्राप्त करण्यासाठी काढणी व हाताळणी ह्या बाबींची काटेकोरपणे देखरेख करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कामामध्ये निष्काळजीपणा झाल्यास आनुवंशिक शुद्धता, रोग व कीडरहित बीजोत्पादन करण्यासाठी वापरलेला वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता असते. तसेच काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणी, मळणी प्रक्रिया, वाळवण, स्वच्छता, प्रतवारी, बियाणे संस्कार, पॅकिंग, लेबलिंग आणि सीलबंद करणे, साठवण, धुरीकरण, वाहतूक या कामासाठी योग्य तंत्रज्ञान वापरले नाही व योग्य तंत्रज्ञान वापरले नाही व योग्य ती काळजी घेतली नाही तर तयार झालेल्या बियाण्याच्या गुणवत्तेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.