कोकमचे फायदे
१) कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटामीन “सी” ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत.
२) हयड्रोसेंट्रिक अॅसिड नावाचा आरोग्यदायी घटक देखील यात आहे.
३) मॅगनिज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम अशी खनिजद्रव्ये कोकममध्ये आहेत.
४) मधुमेहींसाठी कोकम फायदेशीर आहे. शरीरात इन्सूलिन्सची निर्मिती करून मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होईल.
५) कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारते.
६) कोकममध्ये अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट हे दोन गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
७) शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकममध्ये आहे.
८) कोकम सरबत म्हणजे कार्डिओ टॉनिक आहे. यामुळे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.
९) कोकममध्ये असणारा हायड्रो क्रिटिक अॅसिड हा घटक शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास मदत करतो.
१०) आहारामध्ये कोकमचा नियमित वापर केल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
कोकम पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर भिजवलेले कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे.
त्यात जिरेपूड आणि साखर घालावी. हे पाणी प्यायल्यानं शरीरावरील शीतपित्त दूर होईल. नियमित कोकम सरबताचे प्राशन केल्यास पित्त विकार दूर होण्यास मदत होते. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते.
उन्हाळ्यात तर आहारात कोकमाचा अवश्य समावेश करा. त्यासाठी काही खास पर्याय. कोकम करीभूक वाढवण्यास कोकम करी फायदेशीर ठरते. कोकम करी बनवण्यासाठी कोकम पाण्यात भिजत घाला आणि त्याचा रस काढा. चवीनुसार त्यात मीठ आणि साखर घाला. हिंग, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घाला. एकत्र मिक्स करा आणि प्या.
कोकम सरबत उन्हाळ्यात कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात होणारे डिहाड्रेशनचा त्रासापासून सुटका करण्यासाठी कोल्ड ड्रिंकऐवजी कोकम सरबत घ्या. मीठ, जिरेपूड, धनापूड घालून कोकम सरबत घेणे उपयुक्त ठरेल. कोकम चटणी५-६ कोकम पाण्यात भिजत घालून त्यात मीठ, गुळ, हिरव्या मिरच्या आणि जिरे घालून वाटा. खाण्यासाठी चटणी तयार.
आमटीत किंवा भाजीत कोकम घालादररोज आहारात कोकमाचा समावेश करण्याचा हा सोपा उपाय आहे. फिश करी, भेडींची भाजी, सांबार, आमटी बनवताना त्यात कोकम घाला. सोलकढीसोलकढी प्यायल्याने भूक वाढते. पचन चांगले होते. कोकम पाण्यात मिसळून त्याचा घट्ट रस काढावा. नारळाच्या दूधामध्ये कोकमाचा कोळ मिसळून त्यावर हिंग़, मोहरी, जिरं, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्यावी. तयार मिश्रण नीट एकत्र करून काहीवेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे.
आता सुरू होणा-या उष्ण दिवसांमध्ये हे सरबत जरूर प्यावे. रातांब्याचे झाड बहुगुणी आहे, म्हणूनच कोकणी आहारात कोकमांच्या सोलांचा म्हणजे आमसुलांचा वापर होतो. तसंच कोकमाच्या आगळाचाही स्वयंपाकात वापर केला जातो. कोकमामुळे अंगात शीतलता आणि माधुर्य वाढून जळजळ, दाह कमी होतो. जगाच्या बाजारात हजारो कोटी रुपयांची कृत्रिम शीतपेयांची निरुपयोगी उत्पादनं खपतात.
कोकम सरबत हे अशा कृत्रिम शीतपेयांना योग्य प्रतिस्पर्धी ठरू शकते. कोकणात कोकमाचे उत्पादन वाढवल्यास त्याचा कोकण प्रांताला फायदा होईल. कोकणातील रातांबा या पिकाचे योग्य प्रकारे जर संवर्धन झाले तर जगाला ते वरदान ठरणार आहे. पित्त विकाराने ग्रस्त असणा-या रुग्णांसाठी कोकम आणि कोकमापासून बनवलेली उत्पादने फायदेशीर आहेत.
रातांब्याची हिरवी फळे काठीने झोडून जमिनीवर पाडतात आणि ती कापून त्यात मीठ घालून वाळवतात. त्याऐवजी पिकलेली रातांबा फळे झाडावरच तयार झाली तर ती अधिक मौल्यवान ठरतील. दैनंदिन आहारात कोकम सोलांचा वापर हवा.
कोकमाची फळे झाडावर लवकर पिकवा
फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात. कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल – मे महिन्यापासून पुढे तयार होऊन बऱ्याचदा पावसात सापडतात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने कोकमाची फळे लवकर तयार होण्यासाठी संशोधन केले आहे.
कोकम हे कोकणामध्ये अत्यंत महत्त्वाचे; पण आंबा, काजूच्या तुलनेत दुर्लक्षित पीक आहे. कोकम फळापासून केले जाणारे कोकम सरबत, आगळ, आमसुले हे मूल्यवर्धित पदार्थ संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. कोकम हे हृदय विकारावर, लठ्ठपणावर व आम्लतेवर अत्यंत गुणकारी समजले जाते. कोकमाच्या सालीपासून मूल्यवर्धित पदार्थ तर होतातच; पण कोकमाच्या बीपासून तेल देखील मिळते. हे तेल सर्वसामान्य तापमानात घन राहते आणि या तेलाचा वापर औषधात व अनेक औषधी प्रसाधनांत केला जातो.
कोकमामध्ये नर आणि मादी अशा दोन प्रकारची झाडे आढळतात. कोकमाच्या मादी झाडांनाच फुले व फळे लागतात, तर नर झाडांना फक्त फुले लागतात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकमाच्या “कोकम अमृता’ व “कोकम हातिस’ या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही जातींपासून उत्पन्न जास्त मिळते. फळे मध्यम ते मोठी असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी चांगली आहेत.
कोकमाच्या झाडाला जून झालेल्या फांदीला नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात फुले लागतात. कळीपासून फुले उमलण्याचा कालावधी व त्यानंतर फलधारणा यासाठी सुमारे महिन्याभराचा कालावधी लागतो. फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात.
कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल – मे महिन्यापासून पुढे तयार होतात व बऱ्याचदा पावसात सापडतात. कोकमाची फळे लवकर तयार होण्याबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. कोकमाची फलधारणा ज्यावेळेस होते (जानेवारी ते फेब्रुवारी), त्यावेळेस तीन टक्के पोटॅशियम नायट्रेटची (13:0:45) फवारणी करावी. पुन्हा ही फवारणी 20 दिवसांनंतर करावी. या फवारणीमुळे कोकमाची फळे झाडावर लवकर पिकतात, त्याचबरोबरीने झाडाचे उत्पन्न देखील वाढते. फळांची प्रत देखील सुधारते.
कोकमाच्या पूर्ण वाढलेल्या एका मादी झाडापासून किमान 30 ते 50 किलो फळांचे उत्पादन मिळेल. कोकमाच्या बाबतीत हंगामाच्या सुरवातीला फळांचा दर जास्त म्हणजे 10 ते 15 रुपये प्रति किलो असतो. जसा हंगाम वाढत जातो, तसा तो कमी कमी होत जातो. पावसाच्या नंतर तर नगण्य किमतीला कोकम फळे विकली जातात. हे लक्षात घेऊन फळे कशा पद्धतीने लवकर पिकतील याकडे लक्ष देणे आवश्यनक आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
[…] कोकमचे फायदे […]