मूळ व कंद प्रकारातील भाज्या व त्यांचे उत्पादन

0

शेती कशीही असो, त्यातील शेतीकामे ठराविकच असतात. फक्‍त ही शेतकामे वेळच्यावेळी होणे अपेक्षित असते. मातीत खत मिसळून शेती पिकासाठी तयार करणे, बीजारोपण, जलसिंचन, अनावश्यक गवत/रोपटी काढत राहणे म्हणजेच भांगलण करणे. पिकाला रोगराई व किडीपासून वाचवणे, पशू-पक्ष्यांवर लक्ष ठेवणे, त्यांना पिकात घुसू न देणे, वेळेवर रासायनिक खतांचा डोस देणे, आपली जमीन किती व किती प्रमाणात औषधे व खेते लागतील याचा विचार करणे, वेळेवर छाटणी करणे ही शेतकामे होत.

परंतु प्रत्येक भाजीचा प्रकार वेगळा असल्याने प्रत्येक प्रकारानुसार लक्षत्तत ठेवावे लागते. सर्वच भाज्यांना एकाच पद्धतीने उपचार देऊ शकत नाही. बीजारोपणाची वेळ (हंगाम), जलसिंचनाचे प्रमाण, भांगलण यात फरक होऊ शकतो. भूमिगत उगवणार्‍या मूळ व कंद प्रकारातील भाज्या- नवलकोल, मुळा, गाजर, रताळे,बीट, बटाटा, सुरण, अरबी (आळू), आले इत्यादींची चर्चा पुढील अध्यायात केली आहे.

नवलकोल
उत्तर भत्तरतात नवलकोल आवडीने खातात. महाराष्ट्रातही याचे पीक घेतले जाते.
नवलकोलच्या जाती ः-
1) पुसा चंद्रिमा- हे फळ 9 सें.मी. लांब व 10 से.मी. व्यासाचे असते. हे फळ दिसायला पांढुरके, मुलायम गाभा असणारे, किंचित चमकदार, गुळगुळीत असते.
2) पुसा कंचन – फिकट लालसर रंगाचे फळ असते. फळ गोलसर असते.
3) पर्पिल टॉप- या फळाचा वरचा भाग जांभळट असतो. जरा जुनवट झाल्यास भुरकट दिसू लागते. हे फळ चिरून पाहिल्यास आत पांढरे असते. याला गोड चव असते. आकार गोल असतो.
उपयोग ः-
अ) नवलकोलची भाजी शिजवून करतात, पण काहीजण कच्चेसुद्धा खातात.
ब) नवलकोल शेतातच जुनवट होईपर्यंत ठेवल्यास ते कडक, कठीण होते व फळात तंतू वाढतात.
नवलकोलमधील घटक
नवलकोल ही भूमिगत फळभाजी असून यामध्ये पुढीलप्रमाणे घटक असतात. कार्बोहायड्रेटस् 7.5 टक्के, खनिज द्रव्य 0.65 टक्के, पाणी 9 टक्के, प्रोटीन -वसा 0.5टक्के, कॅल्शियम 0.03 टक्के तसेच फॉस्फरस व लोहाचेही अंश असतात.
कुठे व कसे पेरावे?
अ) पेरताना वातावरण थंड असावे, किंचित उबदार वातावरण चालते.
ब) धुके मानवत नाही.
क) हवेत उष्मा वाढल्यास पीकवाढ मंदावते.
ड ) डोंगरी प्रदेशात 15 मार्च ते 15 मे पर्यंत पेरणी करतात.
इ ) मैदानी प्रदेशात 15 जुलै ते 15 सप्टेंबरपर्यंत पेरणी करतात.
अंकुरण ः-
आपण जर खात्रीशीर बियाण पेरले असेल तर 90 टक्क्यांपर्यंत पेरणी यशस्वी होते.
शेताची तयारी ः-
अ) नांगरट करून शेती पेरणीयोग्य करा.
ब) बिया एका ओळीत 30 सें.मी. अंतर ठेवून पेराव्यात.
क ) शेताच्या बांधावरसुद्धा नवलकोलची पेरणी करतात.
ड ) नवलकोल जनावरांच्या खाद्यासाठी लावणार असाल तर पेरणी दाट करावी. पेरणीतले अंतर कमी करावे.
इ) नवलकोलचे बी अतिशय लहान असल्यामुळे ते रेतीत मिसळून पेरतात.
फ) मातीत रेतीचे प्रमाण अधिक असेल तर पीक भरपूर येते.
खते व रासायनिक खते ः-
अ) नवलकोल पिकाला फॉस्फरस व नायट्रोजनची जास्त गरज असते. पोटॅश कमी घातले तरी चालते.
ब) वरील खते प्रति हेक्टरी 200 क्‍विंटल पेरणीपूर्वी शेतात टाकणे.
क) रोपटी बहरून भूमिगत फळे येऊ लागताच नायट्रोजन 60 किलोग्रॅम, फॉस्फरस 45 किलोग्रॅम आणि पोटऊश 35 किलोग्रॅम शेतात टाकावे.
जलसिंचन ः-
अ) शेत जमिनीत ओलावा असतानाच बी पेरावे.
ब) ओलावा कमी असेल तर पेरणीनंतर लगेच जलसिंचन करावे.
क) दाटीवाटीने बीजारोपण केल्याने रोपटी दाट उगवून अल्यास त्यातील अशक्‍त रोपटी काढून टाका.
ड) हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, तर उन्हाळ्यात दर 4 दिवसांनी जलसिंचन करावे.
भांगलण ः-
अ) दर 15 -20 दिवसांनी भांगलण करून अनावश्यक गवत/रोपटी काढा.
ब) भांगलण केल्याने रोपट्यांना ओलावा व प्राणवायू चांगला मिळतो.
क) भांगलण करताना रोपट्यांच्या मुळांवर माती टत्तकत राहणे.
उत्पन्न ः-
नवलकोलचे बी पेरल्यापासून ते पीक घेईपर्यंत योग्य काळजी घेतल्यास प्रति हेक्टर 350 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. नवलकोलचे बीजही विकता येते. हे पीक आर्थिक नका मिळवून देणारे आहे.
मुळा पिकवणे
मुळा कंदमूळ मानला जातो. याची शेती भाजीसाठी तसेच बियाणे मिळवण्यासाठीही केली जाते. काही लोक कोवळा मुळा कच्चा खातात. याचा वापर कोशिंबबिरीतही केला जातो. काही प्रांतात मुळ्याची पाने, मुळ्यासह शिजवून खातात. मुळा इतर भाज्यांबरोबर जोडपीक म्हणून पिकवला जातो . मुळा आयुर्वेदास सारक मानला जातो. पोटाच्या तक्रारी व अपानवायुवर तो औषधासारखे काम करतो.
मुळ्याच्या जाती ः-
मुळा समशितोष्ण प्रदेशात व उष्ण प्रदेशात पिकवला जातो. त्यामुळे तो दोन प्रांतातला वेगळा मानला जातो.
समशितोष्ण क्षेत्रातल्या जाती- व्हाइट इमली, रेजिट रेड- व्हाय, पुसा हिमानी.
उष्ण क्षेत्रातल्या जाती- पुसा देशी, पुसा चेतकी, जपानी पांढरा, पंजाबी पांढरा, पुसा रेशमी, अर्का निशांत.
खते व रासायनिक खते ः-
मुळा पिकाला खत भरपूर लागते कारण त्याची वाढ झपाट्याने होत असते. खत कमी पडता कामा नये. शेतात मुळा लावण्यासप्रति हेक्टर 300 क्विंटल कुजलेले शेणखत घालावे म्हणजे भरपूर उत्पादन मिळेल. याशिवाय सव्वा क्‍विंटल अमोनियम सल्फेट, 50 किलोग्रॅम फॉस्फेट व 90 किलोग्रॅम पोटॅशही शेतात मिसळून टाकावे लागते.
जलसिंचन ः-
अ) पावसाळ्यात पेरलेल्या मुळ्याला जलसिंचनाची गरज नसते.
ब) रोपट्याला 3-4 पाने आल्यावर जलसिंचन करावे.
क) दर 5 ते 7 दिवसांनी जलसिंचनाची आवश्यकता असते.
भांगलण ः-
अ) दर 8 ते 10 दिवसांनी हलक्या हाताने भांगलण करावी. भांगलण करताना अनावश्यक गवत, पालापाचोळा काढून टाकावा
ब) मुळांवर माती चढवत राहणे. माती हलवून खुरप्याने ढिली करावी.
उत्पन्न ः-
अ) देशी मुळा लावल्यास प्रति हेक्टर 150 क्‍विंटलपर्यंत पीक मिळते.
ब ) एशियाई जात लावल्यास प्रति हेक्टर 250 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.
क) युरोपीय जात लावल्यास प्रति हेक्टर 75 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.
बियांचे उत्पन्न ः-
पूर्ण श्रमाने,काटेकोरपणे मुळा पिकवल्यास, खत-पाणी, भत्तंगलण वेळेवर केल्यास, प्रति हेक्टरी 700 किलोग्रॅमपर्यंत बियांचे उत्पन्न होते. शेतकरी या बिया विकून आर्थिक लाभ घेऊ शकतो.
गाजराची शेती
गाजर बहूपयोगी कंदभाजी आहे. गाजराचा हलवा आवडीने सर्वत्र खाल्‍ला जातो. तसेच कोशिंबीर, ज्यूस, लोणचे, मिठाई गाजारापासून तयार करतात. गाजर गोडसर असल्याने कच्चेही खाल्‍ले जाते. गाजरात औशधी गुण असल्याने मानवाला आरोग्य प्राप्त होते. पशुखाद्य म्हणूनही याचा उपयोग आहे. गाजर लाल व काळसर अशा दोन रंगात मिळते.
जल/वायू ः-
अ) कमी तापमानात गाजर पातळ व लांबट बनते.
ब) अधिक तापमानात गाजर बुटके व जाडसर होते.
क) जमिनीत सर्वसाधारणपणे 20 टक्के ओलावा राहिला तर गाजराच्या बियांचे अंकुरण चांगले होते.
माती कशी असावी ?
गाजर पिकाला माती चांगली असावी लागते. ती खोलवर भुसभुशीत,गरम ढिली व ओलसर असावी. शेतात जलसिंचन केल्यानंतर पाणी साचून राहता कामा नये. म्हणजे गाजराचे पीक चांगले येते.
गाजराची लागवड केव्हा ?
अ ) मैदानी प्रदेशात गाजराची लागवड (बी पेरणी) 15 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर पर्यंत करतात.
ब ) डोंगरी क्षेत्रात 1 मार्च ते 30 जुलैपर्यंत पेरणी करतात.
क) गाजराचे बी दाटीवाटीनेच पेरतात.
ड) समतल जमिनीत गाजराची पेरणी केली जाते.
इ) गाजराच्या दोन सर्‍यात 40 सें.मी. अंतर ठेवावे.
गाजराच्या जाती ः-
1) देशी, 2 ) एशियाई, 3) युरोपीय गाजर, युरोपीय गाजराच्या चार जाती आहेत. अ) नानोस, ब) चेटने, क ) जेनो, ड) पुसा केशरी.
खते व रासायनिक खते ः-
अ) गाजराच्या शेतीला 30 किलोग्रॅम नायट्रोजन, 20 किलोग्रॅम फॉस्फरस, 8 ते 10 किलोग्रॅम पोटॅश प्रति हेक्टरी टाकावे. यामुळे 300 क्‍विंटलचे उत्पन्न अपेक्षित आहे. किमान 250 क्‍विंटल तरी गाजर निघते.
ब) कुजलेले शेणखत, कम्पोस्ट खत प्रति हेक्टर 275 ते 300 क्‍विंटल शेतात टाकल्यास चांगले उत्पन्न मिळते.
क) एका कृषितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 45 किलोग्रॅम नायट्रोजन, 45 किलोग्रॅम फॉस्फरस व 90 किलोग्रॅम पोटॅश टाकले तरी पुरेसे असते.
जलसिंचन केव्हा?
अ) पहिले जलसिंचन पेरणीनंतर ताबडतोब करावे, त्यानंतर 5 दिवसांनी करावे.
ब) दर 5 ते 7 दिवसांनी जलसिंचन करावे, म्हणजे जमिनीत ओल राहील.
क ) गाजरे काढण्यापूर्वी शेतात हलके सिंचन करावे म्हणजे गाजरे न तुटता निघतील.
रताळ्याची शेती
रताळे हे बहुउपयोगी कंद आहे. भारतातील अनेक प्रांतांत याची लागवड केली जाते. रताळे उकडून किंवा भाजून खातात. काही प्रदेशात रताळ्याची भाजी केली जाते. शरीराला ऊर्जा देणारा हा कंद मानला जातो. रताळे पिठाळ असते. याच्यापासून स्टार्च बनवतात. कापड उद्योगाला स्टार्चची गरज असते. केक बनविण्यासाठी बेकरीत रताळे वापरले जात.े अल्कोहोल बनवण्यासाठीसुद्धा रताळे उपयोगी आहे. प्रत्येक प्रांतात रताळे काही ना काही कारणासाठी उपयुक्‍त असले तरी उपवासालाच रताळे खाणारे अधिक आहेत. रताळे आदिवासींची भूक भागवते.
जल/वायू ः-
रताळ्याच्या शेतीला किमान चार महिने कडक उन्हाची गरज असते. उताळ्यासाठी शेत खणल्यानंतर ते तसेच 12 दिवस 28 अंश सेल्सिअस तापमानात ठेवले जाते. दिवसा पाऊस झाला तर निदान रात्री उकाडा असावा लागतो. धुके पडले आणि तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास झाल्यास रताळ्याचे नुकसान होते.
शेतजमीन व मातीचे गादी वाफे ः-
चिकणमातीत रेती असणारी दमट जमीन रताळ्यास उपयुक्‍त असते. रताळी बराच काळ जमिनीत असतात. जलसिंचन वेळेवर करा व मातीच्या गादी वाफ्यात पाणी साचू देऊ नका. रताळ्याला नायट्रोजन अधिक लागतो. मातीत नायट्रोजन असेल तर रताळ्याला भरपूर पाने येतात.
रताळ्याची लागवड ः-
अ) जलसिंचन केल्यानंतर रताळ्याची लागवड 15 मे नंतर करतात.
ब) काही जण वर्षातून 2 वेळा रताळ्याचे पीक घेतात.
क) पाऊसमान किंवा जलसिंचन कमी झाल्यास 15 जुलैनंतर लागवड करतात.
ड ) पश्‍चिम बंगाल व बिहारमध्ये 15 मे आणि 15 सप्टेंबर दरम्यान वर्षातून दोन वेळा रताळ्याची लागवड करतात. रताळ्याची कलमे डी.डी.टी.च्या द्रावणात 10 मिनिटे भिजवून लावावीत. कलमाचे डोळे वर असावेत. लागवडीनंतर मऊ माती लोटावी. प्रत्येक कलमाला चार गाठी असाव्यात. एका हेक्टरमध्ये 4500 कलमे लावली जातात. दोन कलमांमध्ये 20 ते 22 सें.मी. अंतर ठेवावे म्हणजे चांगले पीक मिळेल.
खते व रासायनिक खते ः-
अ ) रासायनिक खताचे मिश्रण 40ः12ः4 तयार करून प्रति हेक्टर 13 क्‍विंटल शेतात टाकावे.
ब) या मिश्रणाबरोबर हिरवे खत टाकल्यास पीकवृद्धी होते.
क) आणखी एका मार्गदर्शनानुसार 2 भाग बोन मिल, हाडांचे खत चार भाग शेंगदाण्याची पेंड, एक भाग पोटॅशियम सल्फेट एकत्र करून प्रति हेक्टर 750 किलोग्रॅम टाकावे म्हणजे चांगले उत्पन्न हाती येते.
जलसिंचन ः-
15 मे च्या दरम्यान लागवड केल्यास पावसाळ्यापूर्वी तीन वेळा भरपूर जलसिंचन करावे. कलम लावताच जलसिंचन करावे. जमीन ओलसर राहील याबाबत दक्ष असावे.
भांगलण ः-
बरेचदा भांगलणीचा कंटाळा केलाजातो. रताळा पिकाला किमान दोन वेळा तरी भांगलण करवी लागते. त्यावेळी अनावश्यक गवत, पालापाचोळा काढून टाकावा. दोन भांगलणीत सव्वा दोन महिन्याचे अंतर असावे. पहिली भांगलण लागवडीनंतर महिन्यांने करावी. वेली वाढल्यावर भांगलण थांबवावी.
उत्पन्न ः-
सूचनेनुसार वैज्ञानिक पद्धतीने शेती केल्यास प्रति हेक्टर 250 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. लक्ष दिले नाही तर 90 ते 100 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. ही घट टाळण्यासाठी शेती लक्ष देऊन करावी.
बीटवी शेती
1) बीट काशिंबिरीत, भाजीत वा मटणातही वापरले जाते.
2) बीटमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, जीवनसत्त्व-सी, गंगक, पोटॅशियम, सोडियम इ. घटक असतात.
बीटसाठी जमीन ः-
बीट हे हिवाळ्यातील थंड वातावरणातील पीक/ भाजी आहे. परंतु हल्‍ली उन्हाळ्यातही बीट पिकवले जाते. तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षत्त कमी झाल्यास बीटच्या मुळांवर परिणाम होतो. वाढ खुंटते. भुरभुरीत रेताड ओलसर जमिनीत बीट चांगले वाढते.
खते व रासायनिक खते ः-
बीटसाठी शेती तयार करत असताना शेती 70 ते 75 टन शेण टाकावे. नंतर 65 किलोग्रॅम नायट्रोजन, 110 किलोग्रॅम फॉस्फरस, 75 किलोग्रॅम पोटॅश टाकावे. यामुळे चांगले पीक हाती येते.
पेरणी ः-
बीटचे बी मातीत 2 सें.मी. खोल पेरावे. एका हेक्टरसाठी 13 किलोग्रॅम बी पुरते.
भांगलण ः- पेरणीनंतर 18 दिवसांनी योग्य अंतरावर रोपटी ठेवावीत. रोगट, अशक्‍त रोपटी भांगलण करताना काढावीत. तसेच गवत आणि पालपाचोळा, काट्याकुटक्या काढून टाकाव्यात.
जलसिंचन ः-
दर आठ ते नऊ दिवसांनी शेतीला पाणी द्यावे. जमीन कोरडी पडू लागल्यास जलसिंचन करावे. शेतात ओल राहिली पाहिजे.
बीटच्या जाती ः- 1) क्रिमसन ग्लोब, 2) डिट्रायड डार्क रेड या बीटच्या जाती विशेष प्रसिद्ध आहेत. शेतीला वेळेवर खतपाणी व भांगलण केल्यास प्रति हेक्टर 250 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. पाण्याची तूट पडू देऊ नये म्हणजे शेती लाभदायक होईल.
बटाट्याची शेती
बटाटा हा कंद तीन प्रकारांनी ओळखला जातो.
1) लवकर तयार होणारा बटाटा – यासाठी कफुरी बहार, कुफरी चनुमुखी, कुफरी लवकर, कुफरी अलंकार, कुफरी ज्योती या जातींची लागवड करतात. काही शेतकरी स्थानिक बियाण्यास प्राधान्य देतात.
2) अधिक काळ घेणारा बटाटा – कफुरी शीतमान, कफुरी मुत्रु, कफुरी बादशाह, कफुरी लालिमा, कफुरी चमत्कार, कफुरी सुवर्ण, कफुरी शेरपा या जाती उशिरा तयार होणार्‍या आहेत.
3) उशिरा येणारा बटाटा – वरील जातींपेक्षा उशिरा येणार्‍या बटाट्याच्या जाती- कफुरी चंदन, कफुरी किसान, कफुरी जीवन आणि कफुरी सिंदुरी या चार जाती उशिरा उगवणार्‍यांपैकी आहेत.
बटाटा बहूपयोगी ः-
खरं तर बटाट्याचा उपयोग मुख्यत्वे भाजीसाठीच केला जातो. इतर भाज्यांबरोबर बटाटा घालून मिश्रभाज्याही शिजवल्या जातात. गृहिणींचा लाडका बटाटा टोमॅटोबरोबर शोभून दिसतो, तो शिजतोही लवकर, बटाटेवड्याने आता परदेशातही नाव कमावले आहे. वडापाव खाणारे भरपूर शौकिन आहेत. बटाट्यापासून बटाटा चिप्स, बर्फी, रसगुल्‍ले, गुलाबजामुन, खीर, भजी, समोसे इत्यादी पादर्थ तयार केले जातात.
जल/वायू
पेरणी केल्यापासून ते रोपटे येईपर्यंत 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते. कंद तयार होत असताना तापमान वाढते असावे. बटाटे तयार झाल्यानंतर तापमान कमी व्हावे लागते. बटाटा हे कंदपीक समुद्रसपाटीपासून ते 2600 मीटर उंचीपर्यंत सर्वत्र घेतले जाते.
बटाट्यासाठी जमीन ः-
बटाट्याचे थोडेफार उत्पन्न घेणारे बरेच शेतकरी आणि हौशी बागधारक आहेत. विस्तृत प्रमाणात बटाटा पीक घेण्यासाठी मातीत जीवांश असावे लागतात. तसेच माती रेताड व भुसभुशीत असावी. त्यात ओलसरपणा असावा. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था असावी. शेत तयार करताना 6-7 वेळा नांगरट करून ढेकळे फोडून माती समतल करावी.
पेरणी कशी करतात?
बटाट्याचेपीक घेण्यासाठी जे बियाणे म्हणून बटाटे घ्याल ते लहान असू नयेत. लहान बियाणे उशिरा अंकुरतात व अंकुरण कमी प्रमाणात होते. फुटवा नावाची जात पेरणीसाठी उत्तम मानली जाते. डोळे फुटलेलाच संपूर्ण बटाटा पेरावा असे नाही बटाट्याचे दोन तुकडे कापून तेपेरावेत. बटाट्याचे बियाणे असणारे डोहस बटाटे कूपन ते 1ः100 प्रमाणात मक्युरिक क्लोराईडच्या द्रावणात बुडवून घ्यावेत व नंतर पेरावेत.
बटाट्याचे बियाणे ः-
पेरणीचे बटाटे कसे असावेत याबद्दल काही सूचना.
1) ज्या बटाट्याची तूट-फूट वा चिरडला असेल तो बटाटा घेऊ नये.
2) ज्या बटाट्याला डोळे नाहीत तो बाटाटा पेरु नये.
3) पीक चांगले येण्यासाठी मोठे डोळस बटाटेच बियाणे म्हणून निवडा.
4) ज्या बटाट्याला आतूनवा बाहेरून कीड लागली असेल तो बटाटा पेरणीस अयोग्य समजावा.
5) पेरणीच्या बटाट्याच्या तुकड्यास किमान 2 डोळे असावेत. डोळे नसल्यास पीक/रोप येणार नाही.
पेरणीची वेळ ः-
सर्वच क्षेत्रात पेरणीची वेळ/काळ सारखा नसतो. मैदानी प्रदेश व डोंगराळ प्रदेशात वेगवेगळा असतो.
1) मैदानी प्रदेश – तामिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात जुलै ते ऑगस्ट दरम्यान पेरणी करतात. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर आणि उत्तर आणि दक्षिण भारतात 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान बटाटे पेरतात.
2) डोंगरी प्रदेश – मार्च ते एप्रिलमध्ये एकदा व जुलै ते ऑगस्ट दरम्यान दुसर्‍यांदा पेरणी केली जाते.
अधिक उत्पन्नासाठी ः-
अ) समतल असणार्‍या शेतात मातीचे गादी वाफे तयार करून बटाट्याची पेरणी करतात. दोन सर्‍यांमधून पाणी सोडले जाते. काही प्रांतात सर्‍याऐवजी मातीचे चौकोन बनवून त्यात पेरणी करतात.
ब) देान रोपट्यांमध्ये 18 ते 20 सें.मी. अंतर सोडले जाते.
क) दोन सर्‍यांमध्ये 50 सें.मी. दरम्यान अंतर ठेवतात.
खते व रासायनिक खते ः-
अ) बटाट्याची रोपटी शेतातील पोषक द्रव्यामुळे वाढत असतात. यासाठी 105 किलोग्रॅम नायट्रोजन, 55 किलोग्रॅम आणि 220 किलोग्रॅम पोटॅशियम प्रति हेक्टर शेतात मिसळून टाकावे. खते योग्य ववेळेवर मिळाल्यास पीक जोमदार येते.
ब) 10 ते 12 गाड्या शेणखत तसेच नायट्रोजन 75 किलोग्रॅम, फॉस्फरिक आम्ल 65 किलोग्रॅम आणि 35 किलोग्रॅम पोटॅश दिल्याने बटाटा चांगला व भरपूर येतो.
क) खते व रासायनिक खते थेट बटाट्यांच्या रोपट्यांवर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. खते बाजूला मातीत टाकावीत.
जलसिंचन ः-
बटाटा पिकाला जमीन ओलसर लागते, परंतु पाणी साचून राहता कामा नये. पाण्याचा निचरा होईल याकडे लक्ष द्यावे. रोपटी 8 ते 9 सें.मी. उंचीची होताच पहिले जलसिंचन करावे. भांगलण करताना रोपट्याच्या मुळांशी व उघड्या पडलेल्या बटाट्यावर माती टाकावी. त्यानंतर दर 4-5 दिवसांनी जलसिंचन करावे. पाणी तुंबणार नाही याकडे लक्ष द्यावे.
भांगलण ः- बटाटा पिकात गवत वाढू देऊ नका. जलसिंचनानंतर गवत काढून टत्तका. बटाटा पीक शेतात असेपर्यंत किमान 3-4 वेळा भांगलण केली जावी. पिकातून पाण्याचे लहान लहान पाट काढा म्हणजे पाणी वाहून जाईल. बटाटे उघडे पडू देऊ नयेत. त्यावर माती चढवत राहणे.
रासायनिक खते थोडी थोडी टाकत राहण्यापेक्षा एकदाच मातीत मिसळून टाकल्यास ते कारणी लागतं असे कृषितज्ज्ञ म्हणतात.
उत्पन्न ः-
बटाट्याच्या हंगामात लावलेल्या पिकातूनप्रति हेक्टर 200 ते 220 क्‍विंटल उत्पन्न मिळते. बिगर हंगामी लागवडीत प्रति हेक्टर 25 ते 30 क्‍विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. जास्तीत जास्त 38 क्‍विंटलपर्यंत उपन्न मिळते.
खुरण (जिमीकंद) शेती
भूमिगत कंद प्रकारात सुरण पिकाची शेतीही आर्थिक लाभ मिळवून देणारी आहे. सुरण मोठे व वजनदार असते. याची भाजी करून खाणारे जसे आहेत तसेच सुमरण हे औषधी असल्याने त्याला मागणी भरपूर आहे. सुरणाचे लोणचे तयार केले जाते. मूळव्याध विकारात सुरण खाण्याचा सल्‍ला दिला जातो.
जमीन कशी असावी?
सुरणाकरिता हलकी, भुसभुशीत, ओलसर जमीन चांगली. शेतात पाणी साचून राहू नये. जमीन खोलवर नांगरून घ्यावी.
सुरणाच्या जाती ः-
सुरण देशी आणि सुरण गजेंद या दोन जाती प्रसिद्ध आहेत. नवी जात श्रीप्रिया आता लोकप्रिय होऊ लागली आहे.
पेरणी कशी करतात?
शेत खोलवकर नांगरून जमीनसपाट करतात. मातीचे गादीवाफे तयार करून त्यात सुरणाचे कळ्या आलेल कापे पेरले जातात. दोन कापांमध्ये 20 ते 50 सें.मी. चे अंतर ठेवतात. सुरणाला कळ्या (डोळे) असतात. ते मोकळ्या हवेत दीड-दोन महिने ठेवतात. नंतर त्यांची पेरणी करतात. उत्तर प्रेदशमधील शेतकरी फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत सुरणाची पेरणी करतात. तर दक्षिणेतील शेतकरी मे महिन्यात सुरण लावतात.
सुरणाचे दोन खाद्यप्रकार ः-
सुरणाच्या चवीवरून व दिसण्यावरून दोन प्रकार होतात.
1) एक सुरण भेंडीसारखी चिकट असते. ते खाताना त्याचा गिळगिळीतपणा घशाला जाणवतो. 2) दुसर्‍या प्रकारच्या सुरणाला छोटे छोटे सुरण चिकटलेले असतात. गिळगिळीत सुरण अधिक पिकवला जातो व तो कमी भावात विकला जातो. तर लेकुरवाळा सुरण गिळगिळीत नसल्यामुळे खायला रुचकर व किमतीने महाग असतो.
जलसिंचन ः- सुरणाला उन्हाळ्यात भरपूर पाणी दिले जाते. तर पावसाळ्यात पाणी साचून राहू नये म्हणून काळजी घेतली जाते. उन्हाळ्यात जमीन ओलसर रहावी याबद्दल दक्ष असावे.
भागलण ः- सुरणाच्या पिकात अनावश्यक गवत, कचरा, पालापाचोळा ठेवू नये. भांगलण करून तो काढून टाकावा. खुरप्याने जमीन भुसभुशीत, पोकळ करावी. जमीन टणक होऊ देऊ नये. सुरण शेतात असेपर्यंत 2-3 वेळा भांगलण झाली पाहिजे. जमिनीतले कंद उघडे पडू देऊ नका. त्यावर माती चढवा व जमीन ओलसर ठेवा.
खते व रासायनिक खते ः-
सुरणाला टॉप ड्रेसिंगमध्ये 70 किलोग्रॅम नायट्रोजन प्रति हेक्टरी द्यावे तसेच अमोनियम सल्फेट 2 वेळा 15-20 दिवसांच्या अंतराने टाकावे. सुरण तयार होऊन काढणीपर्यंत हलकेसे जलसिंचन करावे लागते.
कंद केव्हा काढावेत?
भूमिगत सुरणाचे कंद जेव्हा तयार होऊ लागतात तेव्हा वरील रोपटी कोमेजू लागतात. रोपटे कोमजताच जमीन खणून कंद काढावेत. ऑक्टोबरचा मध्य ते नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरण काढले जातात.
उत्पन्न ः- समरुणाचे पीक प्रति हेक्टर 55 ते 95 टनापर्यंत मिळते. मार्केटिंग व्यवस्थित केल्यास चांगला नफा मिळतो.
अरबी (आळू )ची शेती
अरबी ही भाजी भूमिगत कंदासारखीच आहे. हे कंद वेगवेगळ्या आकाराचे परंतु मध्यभागी फुगीर असतात. या कंदाला साल असते. याची पाने हृदयाच्या (बदामी) आकाराची असतात. पाने ढोपराएवढी उंचहोऊन हवेबरोबर डोलत असतात. एका दांड्याला एकच पान असते. दलदलीच्या जागेत, नाल्याच्या, तलावाच्या काठी आळू भरपूर येतात.
जंगलातील आळू जंगली प्रकारचे असून ते स्वतःच उगवत राहतात. अरबी(आळू) हा एक भाजीप्रकार असून, आळूचे फदफदे हा भाजीप्रकार लोकप्रिय आहे. आळूचे कंद उकडून खातात. तो चवीला गोडसर असतो. समुद्र सपाटीपासून ते 2350 मीटरपर्यंत उंचीवर सुद्धा आळू पिकवला जातो. अरबीला कचालू असेही उत्तर भारतात म्हणतात. कचालू जरा मोठे असतात. आळूची पाने व देठ यांची भाजी खाल्ल्याने पोटदुखी व अपचन दूर होते.
आळूच्या जाती ः-
श्रीपल्‍लची, सरकाचू सतमुखी, श्रीरश्मी, गौरिया, देशी बंडा या आळूच्या प्रचलित जाती असून, प्रांतानुसार यांना वेगळी नावे आहेत.
जमीन कशी असावी?
आळूच्या लागवडीसाठी लोखवर नांगरट करावी लागते. माती रेताड, ओलसर असावी. भुसभुशीत मातीही चालते. 3-4 वेळा नांगरट करून जमीन सपाट करावी. त्यानंतर मातीचे गादीवाफे तयार करावेत. वाफे तयार करत असतानाच गवत, पालापाचोळा काढून टाकावा. वाफ्यावर आळूचे कंद पेरावेत. काही प्रांतात आळूला धुईचा असे म्हणतात.
खते व रासायनिक खते ः-
आळूच्या शेताला प्रति हेक्टरी 40 ते 45 किलोग्रॅम कम्पोस्ट खत टाकावे. 180 ते 190 किलोग्रॅम अमोनियम सल्फेट टाकावे. हे खत एकावेही न टाकता दोनीागात दोनवेळा टाकावे. पहिला भाग अंकुर दिसू लागताच व दुसरा भाग जूनच्या मध्यावर ते जुलै अखेरीस टाकावा. एक कृषी सल्‍ला असा की, 225 ते 250 क्‍विंटल कुजलेले कम्पोस्ट खत टाकल्यास पीक भरपूर येते.
दुसरा सल्‍ला असा की, प्रति हेक्टरी 200 ते 210 किलोग्रॅम सुरप फॉस्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश किंवा अमोनियम सल्फेट शेतात टाकावे म्हणजे भरपूर उत्पन्न मिळते.
आळूची पेरणी ः-
दक्षिण भारतात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आळूचे गड्डे लावले जातात. डोंबरी क्षेत्रात जून-जुलैमध्ये तर उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात मार्च-एप्रिल व जून-जुलै महिन्यात पेरणी केली जाते.
आळूचे गड्डे 6 ते 8 सें.मी. खोलवर जमिनीत व 55 ते 65 सें.मी. अंतरा-अंतराने लावले जातात. मातीचे गादी वाफे 40 ते 48 सें.मी. रुंदीचे असावेत. मधून पाण्याचा पाट काढावा.
जलसिंचन ः-
आळूचे गड्डे लावण्यापूर्वी जमीन ओलसर असावी. जर अंकुर फुटण्यास वेळ लागला तर जलसिंचन करावे. पावसाळ्यात 8 -10 दिवसांनी पाऊस नसताना जलसिंचन करावे.
भांगलण ः-
भांगलण करताना खुरप्याने माती उलटपालट करावी. मुळावर माती चढवावी. अनावश्यक गवत-पालापाचोळा काढावा. माती नरम राहील याकडे लक्ष द्यावे.
उत्पन्न ः-
प्रति हेक्टरी 125 ते 150 क्‍विंटल आळूचे उत्पन्न मिळते. जर काळजीपूर्वक निगराणी केली तर यात 50 क्‍विंटलची आणखी भर पडू शकते.
आले शेती
आले पिकवणारे शेतकरी शेतात थोड्याफार आल्याची जोडपीक म्हणून लागवड करतात. भारतातून प्रतिवर्षी 4 ते 5 कोटी रुपयांचे आले निर्यात होते. जगाला आल्याची जी गरज आहे त्यापैकी 50 टक्के आले भारतातच पिकवले जाते. आले मसाल्यात वापरतात. औषध म्हणून आले उपयुक्‍त आहे. सर्दी, खोकला, पित्त यावर आले गुणकारी असते. आले वाळवून सुंठ बनविली जाते.
आले पिकासाठी शेत ः-
आले पिकवण्यासाठी 5-6 वेळा नांगरणी केली जाते. त्यामुळे माती मऊ, भुरभुरीत होते. परसबागेत फावडे वापरून माती उकरतात व छोटे छोटे वाफे तयार करतात. पावसाळा सुरू होताना आले लावले जाते.
आले पिकाच्या जाती ः-
आले पिकाच्या चार प्रमुख जाती आहेत. 1 ) वायनड, 2) रीयोजेनिरियो, 3 ) मादन, 4 ) वायनड लोकल. महाराष्ट्रात देशी आले व हायब्रीड आले असे दोन प्रकार आहेत.
पेरणी कशी करावी ः-
मे महिन्याच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत आले लागवड केली जाते. जून महिन्यात पेरणी करणे चांगले असे कृषितज्ज्ञ म्हणतात. काही प्रांतात डिसेंबर-जानेवारी महिन्यात आले पेरले जाते. आल्याच्या दोन गुड्यात 15 ते 20 सेें.मी. अंतर ठेवावे .
खते व रासायनिक खते ः-
1) आले पिकाला खत कमी पडू देऊ नये.
2) एक वर्ष आले लावल्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी आले लावतात कारण आले जमिनीतील पोषकद्रव्ये फार घेते.
3 ) आले पिकासाठी शेत तयार करत असतानाच प्रति हेक्टर 275 क्‍विंटल कंपोस्ट खत मातीत मिसळावे. याशिवाय 55 किलोग्रॅम नायट्रोजन आणि 30 किलोग्रॅम सुरप फॉस्फेट, 120 किलोग्रॅम पोटॅशही शेतात टाकावे.
4 ) आले जर समाधानकारक उगवून आले नाही तर वरील नमूद रासायनिक खते पुन्हा 2ः2ः4 या प्रमाणात अर्धा टन प्रति हेक्टरी अडची महिन्यानंतर टाकावे.
थोडक्यात महत्त्वाचे ः-
अ) दुसर्‍यांदा रासायनिक खत घालण्यापूर्वी भांगलण करावी.
ब) अनावश्यक गवत, रोपटी काढावीत. रोपांच्या मुळाशी माती चढवावी.
आले काढणी ः-
आले पेरल्यानंतर सात-आठ महिन्यांनी तयार होते. आले भूमिगत असते. परंतु त्याचे रोप जमिनीवर असते. रोपटी वाढू लागली की आले तयार झाले आहे असे समजावे. आले जमीन खणून काढावे लागते. हे काम काळजीपूर्वक करावे म्हणजे तूट- फूट होणार नाही.
उत्पन्न ः-
अ) पेरणी केल्यापासून योग्य देखभाल केली तर प्रति हेक्टर 80 ते 90 क्‍विंटल आले उत्पादन मिळते.
ब) एक हेक्टरमधील आले सुकवून त्यांची सुंठ बनवली तर 17 ते 19 क्‍विंटल सुंठ होते. आले हे आर्थिक यश मिळवून देणारे पीक आहे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.