नांदूर घाट येथील परिस्थिती
केज / प्रतिनिधी
तालुक्यात यावर्षी पाऊस काळ चांगला होईल. अशा आशेवर नांदुर घाट परिसरातील केळी बागेची लागवड केली. मशागत रोपे इतर कामावर मोठ्या प्रमाणात खर्च केला, मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे केळीची बाग करपून चालली आहे. या बागांवर केलेला खर्चही न निघाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पारंपरिक पिकांच्या सततच्या नापिकीवर मात करण्यासाठी नांदुर घाट येथील शिवाजी महादेव जाधव यांनी यावर्षी प्रथमच फळबाग लागवडीचा प्रयत्न केला. अडीच एकर केळी लागवड केली. यामध्ये 3800 रोपे केळीच्या रोपांची लागवड केली. फवारणी, खत, पाणी ठिबक यावर दीड ते दोन लाख रुपये इतका खर्च केला आहे. खर्चासह मेहनत करून त्यांनी बाग फुलवली. केळीच्या झाडाला पीक लागायच्या आधीच बाग करपून चालली आहे. त्यामुळे पिकण्या आधीच बाग हातातून चालल्याने झालेला खर्चही निघतो का नाही याची शाश्वती नसल्याने दुष्काळात नांदुर घाट येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पहिल्यांदाच फळबाग लागवडीचा प्रयत्न दुष्काळामुळे अपयशी ठरल्याने शेतकरी हताश झाले आहेत. पारंपरिक पिके परवडत नसल्याने शेतकरी प्रयोगशील शेती करत आहेत, मात्र हे प्रयोग निसर्गाच्या लहरीपणामुळे हसत असल्याने शेतकर्यांवर मोठे संकट ओढावले आहे. केळीबाग झालेला खर्च हा खर्च कसा भरून काढावा याची चिंता असलेले शेतकरी शिवाजी जाधव यांनी सांगितले. नांदुर घाट परिसरातील इतरही बागांना थंडीचा व पाणीटंचाईचा फटका शेतकर्यांना बसू लागला आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.