सध्याच्या काळात वनशेतीमध्ये विविध वृक्षांचे बियाणे गोळा करणे, वृक्षाची छाटणी आणि वणव्यांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. वृक्षांची छाटणी केल्यास नवीन फांद्या येण्यास मदत होऊन झाडाची प्रतसुद्ध सुधारते. सध्याच्या काळात वनवृक्षांचे बियाणे गोळा करावे. बियाणे योग्य पद्धतीने वाळवावे. बियाण्याची गुणवत्तेनुसार प्रतवारी करावी. लागवडीपर्यंत बियांची ओळख ठेवणे आवश्यक असते. वनीकरण कार्यक्रमासाठी सातत्याने योग्य मात्रेत बी मिळवणे आवश्यक आहे. बियांची मात्रा निश्चित करून पुरेशा मात्रेत बी गोळा करून साठवणूक केली तरच वेळेवर बीपुरवठा करणे शक्य होते. चांगले बीजधारण काही ठरावीक वर्षाच्या अंतराने होत असते. वृक्ष फुलोऱ्यावर असताना येणारे रोग, कीड, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे फळधारणेवर विपरीत परिणाम होतो हे लक्षात घेऊन चांगले पीक ज्या वर्षी आले असेल, त्या वर्षी जास्तीत जास्त बियाणे गोळा करून चांगले प्रकार संग्रहित करून ठेवावे.
जंगलाची उपयुक्तता :
- झाडे हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात आणि प्राणवायु हवेत सोडतात.
- अनेक झाडे ओझोनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.
- दुर्मिळ प्राणी, वनौषधी वनस्पती यांचे जतन जंगलांमुळेच होत असते.
- घनदाट जंगलांमुळेच हवेतील बाष्प शोषून घेतल्याने त्यातील थंडावा राखला जातो.
- पावसाची तीव्रता जंगल भागात अधिक असते. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते अन् भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होते.
- खोलवर रुजलेल्या मुलाच्या सहाय्याने जमिनीची धूप थांबवली जाते अन् जमिनीची सुपीकता कायम राहते.
वृक्षांचे कार्य :
- प्राणवायु (ऑक्सिजन) उत्पादन.
- हवेचे प्रदूषण थांबवणे.
- भूमीची फलदृपता टिकवणे आणि भूमीची धूप थांबवणे.
- भूगर्भ पाण्याची पातळी उंचावणे आणि हवेत आद्रता टिकवणे.
- पशुपक्षी यांचे आश्रयस्थान.
- अन्न निर्माण करणे.
झाडांच्या अनेक मानवोपयोगी कार्यांपैकी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे जमिनीतील पाणी आणि हवेतील वायू यांच्या मदतीने सूर्य किरणांमधील ऊर्जा आपल्या अंगात साठवून ठेवणे याला प्रकाशविष्लेषण प्रक्रिया म्हणतात. ही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी वनस्पतीमधील ज्या द्रव्यामुळे हिरवा रंग प्राप्त होतो त्या हरित द्रव्यामध्ये असते. वनस्पतींना खावून जगणारे प्राणी आणि त्या प्राण्यांपैकी काहींना खाऊन जगणारे दुसरे प्राणी या सगळ्यामध्ये जी ऊर्जा किंवा शक्ती बघतो ती सगळी सरते शेवटी सूर्यकिरणांमधीलच असते व ती मुळात वनस्पतीमधील हरित द्रव्याने पकडून बंदिस्त करून ठेवल्यामुळेच या प्राण्यांपर्यंत आलेली असते. मनुष्यप्राणीही याला अपवाद नाही.
या सूर्यकिरणविष्लेषण प्रक्रियेमध्ये आणखी एक अतिमहत्त्वाची क्रिया सामावलेली आहे, ती म्हणजे हवेतील कर्ब वायूच्या स्वरुपात असलेली कर्ब (कोळसा) वनस्पतींच्या अंग-प्रत्यांगात साठवून ठेवणे. एक वैज्ञानिक सत्य असे आहे की, हवेतील कर्ब वायूचे प्रमाण वाढले की हवेतील सूर्यप्रकाशातील उष्णता धरून ठेवण्याची क्षमता वाढते. परिणाम असा होतो की हवेचे तापमान वाढते. हवेचे तापमान वाढले की त्याचे अनिष्ट परिणाम तमाम प्राणीमात्रांना भेडसावू लागतात. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणतात ते हे! हवेत जास्त झालेला कर्ब कमी करण्याची क्षमता आपण वर बघितल्याप्रमाणेच फक्त वनस्पतींमध्येच आहे.
जंगलतोडीचे परिणाम :
निसर्गाच्या या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे दुरूस्त करणेही जमन्यासारखे नाही.
अशा मोडलेल्या बिघडलेल्या चक्रांपैकी एक म्हणजे जंगल. गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडले एवढाच उद्योग माणसाने केला आहे. शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी, खाणींसाठी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी अशा नानाविध कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो. त्याचे दुष्परिणाम झोंबू लागले आहेत.
- जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही.
- ज्या प्रमाणात जंगलतोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगर-माथेही उजाड होत आहेत. अन् जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि त मानवी वस्त्यांत आसरा शोधात आहेत त्यामुळे महाराष्ट्रात किंवा इतर प्रदेशात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत.
- दिवसेंदिवस होणार्या जंगल कटाईमुळे मातीची धूप, वृक्षांची कामरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षअभावी येणारे पूर अशा समस्या जगात जागोजागी भेडसावत आहेत. गतवर्षी केदारनाथला आलेला पूर हा जंगलतोडीचाच परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत आहे त्यामुळे बाष्पिभवनाचे प्रमाण वाढत आहे परंतु पर्जन्यवृष्टी मात्र त्या प्रमाणात होत नाही म्हणून जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढत नाही ह्या समस्या आज निर्माण झाल्या आहेत.
वणव्यापासून संरक्षण :
1) वनसंपत्तीचे वणव्यापासून संरक्षण करणे अत्यावश्यवक आहे. जानेवारी ते मे या महिन्यात वने, वनशेती किंवा बागांना आग लागण्याची शक्य ता जास्त असते.
2) आपल्या बागेला किंवा वनक्षेत्राला आग लागू नये, यासाठी वनक्षेत्राच्या चारही बाजूने गवत, काडी-कचरा इत्यादी जाळून नष्ट करावा. जेणेकरून आग लागल्यास ती आतील भागापर्यंत पोचणार नाही.
3) साधारणपणे 10 ते 20 फूट पर्यंतचा सलग पट्टा साफ केल्यास आग पसरण्याचे प्रमाण खूप कमी होते. तसेच वनक्षेत्राच्या आतील बाजूचे संरक्षण करण्यासाठी वनक्षेत्राच्या मध्यभागापासून एक उभा व एक आडवा 10 ते 20 फूट पर्यंतचा पट्टा साफ केल्यावर आतील भागाचा वणव्यापासून बचाव होऊ शकतो. एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये वणवा पसरण्याची भीती राहत नाही.
4) वनक्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी फायर लाइन काढायची आहे, अशा ठिकाणचे गवत, झुडपे कापून, पालापाचोळा जमा करून 10 ते 15 दिवस ठेवावा. हे सर्व वाळल्यानंतर त्याला नियंत्रितपणे आग लावल्यास फायर लाइन तयार होईल. या प्रकारात खर्चसुद्धा होतो. ही पद्धत दीर्घवेळ वणव्यापासून संरक्षण देते.
जंगलतोड थांबवण्यासाठी व वनक्षेत्र वाढवण्यासाठी उपाय :
जंगलात माणूस जितकी कमीत कमी लुडबुड करेल तितके आपले चक्र दुरुस्त करण्याची निसर्गाला संधी मिळते, यासाठी खालील उपाय करता येतील.
- जंगलतोड तर थांबलीच पाहिजे पण त्याचबरोबर नवीन झाडेही लावली गेली पाहिजेत पण निरीक्षणातून असे लक्षात येते की वृक्षरोपण केलेली ७०-८० टक्के झाडे मरतात. म्हणून त्यांची योग्य निगा राखून ती योग्य प्रकारे वाढतील याची काळजी घेतली पाहिजे. वृक्षरोपण करा तसेच वृक्षांचे रक्षण करा. तुम्ही ग्रामीण भागात रहात असंल तर घराच्या परिसरात कडुलिंब, पिंपळ, तुळस इत्यादी झाडे अवश्य लावा, तसेच गायही पाला त्यामुळे आपले घर आरोग्याशाला बनेल.
- कोणत्याही कारणासाठी शुभेच्छा देताना एक झाड भेट द्या.
- क्रांतीवीरांचे स्मरण, स्वजनांचे प्रेम, देशभक्तांचा अभिमान, विद्वानांचा आदर व्यक्त करायला त्यांची स्मृती टिकवण्यासाठी इस्त्राईल मध्ये झाडे लावली आणि जोपासना केली. इस्त्राईलमध्ये आज ६०० पेक्षा अधिक दाट जंगले आहेत. ११ अब्जाहून अधिक वृक्ष आहेत. त्यांच्या शहीद वनात ६० लक्ष वृक्ष आहेत. स्मृतीवृक्षांची छाया सर्व देशभर आहे.
- एका वृक्षाची तोड केल्यास त्या जागी १० झाडांची लागवड केली पाहिजे.
- जागतिक वनदिनानिमित्त प्रत्येकाने किमान एक झाड लावून वनदिन साजरा केला पाहिजे.
सरकारी उपाययोजना
प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे, पण तरीही गेल्या काही वर्षात बेसुमार जंगलतोड झाली सर्व माणसांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता इतक्या पृथ्वीमध्ये आहे, पण कुणा एका माणसाच्या हव्यासाला मात्र ती पुरी पडू शकत नाही, असे एक विधान माणसाच्या हव्यासाबद्दल सांगितले जाते. माणसाला हा हव्यास आहे म्हणूनच आपण निसर्गसंपदा ओरबाडून तिची वाट लावली आहे. वनाचे संवर्धन करण्यासाठी आता सरकारने पावले टाकली असून अधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे किती क्षेत्रावर वने आहेत. चोरटी वृक्षतोड होत आहे का? वन्य जीवांची शिकार होत आहे का? यावर काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे. वनांच्या परिसरात राहणाऱ्यांची उपजीविका त्यावर अवलंबून असते. त्यांनी केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, वनौषधी आणि अन्य उत्पादन यांना चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘वन धन योजना’ यासह अनेक उपक्रम सरकारकडून सुरु करण्यात आले आहेत.
झाडे ही आपल्यासाठी ‘कल्पवृक्ष’ असून ती टिकली तरच उपजीविका चालू शकणार आहे. हे परिसरातील रहिवाशांना व आदिवासींना पटवून देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लोकसहभागातून प्राणी व वनसंपदेचे संरक्षण साधता येणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशात पर्यावरण संतुलन साधत विकास हाच मध्यमार्ग असू शकतो, पर्यावरणाचे संतुलन साधायचे असेल तर जंगले हवीच. त्यामुळेच वनक्षेत्राच्या वाढीसाठी सर्वच स्तरांवरून प्रयत्न होताना दिसतात.
वनांचे महत्त्व लोकांना पटावे आणि सततच्या पडणाऱ्या दुष्काळाला आळा बसव म्हणून शासनाने पुढील प्रकारच्या काही योजनाही सुरु केल्या आहेत.
- महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या टेकड्यांचे हिरवीकरण करणे.
- महत्वाचे रस्ते, कालवे आणि रेल्वे लाईनच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे.
- वनेत्तर क्षेत्रातील पाणथळे, सरोवरे इत्यादी जैवविविधतेचे व्यवस्थापन करणे.
- उच्च तंत्रज्ञानाद्वारे रोपनिर्मितीसाठी वृत्त प्रसारण, महसूल विभागस्तरावर आणि
तालुकास्तरावर रोपवाटिका निर्मिती करणे.
अशा विविध योजना आखण्यात आल्या असून याचा मानवाला पुढील काळात फायदा होईल म्हणून या सर्व योजनांचा उद्देश हाच आहे की, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली तर येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना सावली मिळेल, प्रवास सुखकारक होईल, वाहनाद्वारे होणार्याज कार्बन मोनोक्साईडद्वारे होणार्याव प्रदूषणास आळा बसून या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार कमी होऊन रस्त्याचे सौंदर्य वाढेल तसेच निसर्ग सौंदर्यातही भर पडेल. स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उजाड आणि पडीक क्षेत्राचा विकास होईल. पर्यावरण संतुलनास मदत होईल. स्थानिक जैवविविधतेचे जतन होऊन त्यामध्ये वृद्धी होईल. शासकीय-निमशासकीय क्षेत्रावर होणारे अतिक्रमण रोखल्या जातील. उघड्या आणि मोकळ्या टेकड्यांवर वृक्षांची लागवड केल्यास भूसंवर्धन आणि जलसंधारण हि संकल्पना प्रत्यक्षात आणल्या जायील. धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणी आकर्षित करणारी वानराई असली तर पर्यटकांना आकर्षण निर्माण होईल आणि त्यांची संख्याही वाढेल. काही झाडांपासून माणसाला गोड फळेही मिळतील.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.