परभणी / प्रतिनिधी
तिसर्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातील आणखीन तीन मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे जाहीर करण्यात आले. नव्याने दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळांमध्ये गंगाखेड तालुक्यातील एक आणि जिंतूर तालुक्यातील दोन मंडळातील एकूण 80 गावांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळाची संख्या 35 पर्यंत, तर गावांची संख्या 772 झाली.
यावर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरिप पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. परंतु केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम या 6 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. जिंतूर, गंगाखेड, पूर्णा या तीन तालुक्यांमध्ये तो जाहीर करण्यात आला नव्हता.
जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या क्षेत्रीय पाहणी अहवालानंतर दुसर्या टप्प्यात जिंतूर, बोरी, आडगांव, चारठाणा (सर्व ता.जिंतूर), महातपुरी, माखणी, राणीसावरगांव (सर्व ता.गंगाखेड), लिमला (ता.पूर्णा) या 8 मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यानंतर 2018 च्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण 750 मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या, खरिपाची अंतिम पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी आलेल्या गावाबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सादर केला. तो विचारात घेऊन जिल्ह्यातील गंगाखेड महसूल मंडळातील 20, जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा मंडळातील 30, बामणी मंडळातील 30 असे एकूण 80 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला.
या 80 गावांमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार्या जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विज बिलात 33.5 टक्के सवलत, शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी आदी सवलती लागू होतील. आता पूर्णा तालुक्यातील पूर्णा, कात्नेश्वर, चुडावा, ताडकळस या चार मंडळातील 77 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचे बाकी आहे.