जो तो मागतो अबोली मोग-याची वेणी खरच अबोली चे फुलं आहे मोठे गुणी.
अबोलीचे झाड दिसायला फारच मोहक असल्याने त्यास प्रियदर्शनी असे नाव पडले. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. या फुलांचा गजरे करण्यासाठी वापर होतो. यास कोरांटी असे देखील म्हणतात. याच्या सालींपासून बनवलेले तेल जखमा लवकर भरून आणण्यासाठी वापरतात. अबोलीच्या नावातच शांत गुण आहे त्याप्रमाणे अबोलीची फुले पाहूनच शांत, प्रसन्न वाटते.
तस पाहील तर ह्या फुलांना गंध नसतो तरीपण न बोलता मनाच्या कोपर्यात ही फुले कुठेतरी घर करून बसतातच त्याला कारण आहे त्यांच गोंडस रुप, सणासमारंभात असलेल ह्या फुलांच स्थान. दक्षिण भारतात अबोलीची फुले फारच लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातही अबोलीची फुले वेण्या आणि गजरे करण्यासाठी वापरतात. सुगंध नसलेले अबोलीची फुले वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतात. शेंदरी, लाल, पिवळ्या अश्या रंगात फुलणारी अबोली अधिकच लोभसवाणी दिसते. या फुलांना इंग्रजीत Fire cracker flower असे म्हणतात.
- हवामान:- अबोली हे प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील फुलझाड असल्याने यांना कडाक्याची थंडी, थंड वारे, बर्फ पडणे इ. बाबी सहन होत नाही. याउलट दमट हवामान आणि उच्चतम तापमान मात्र यांना चांगले मानवते.
- जमीन:- निचऱ्याच्या, पोयटायुक्त जमिनीत हे झाड चांगले वाढते. भारी आणि उच्च सामू असलेल्या जमिनीत यांची वाढ योग्यप्रकारे होत नाही.
- लागवड:- जमिनीत सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून लागवड केली जाते. जमिनीत बी पेरून अथवा रोपे लावून लागवड केली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला बी पेरून रोपांना चार पाने येताच लागवड करणे योग्य ठरते. लागवडीसाठी अर्धा मीटर ते पाऊन मीटर अंतरावर रोपांमध्ये ३० सें. मी. ते ४५ सें. इतके अंतर राखावे. आपण कुंडीमध्ये देखील अबोलीची लागवड करू शकतो.