कोको पिकाला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. मात्र, परागी भवनाअभावी पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत असल्याचे समोर येत आहे. कोको पिकाचे परागीभवन हे छोट्या माश्या, वास्प या किटकांमार्फत होते. परागीभवनानंतर फुलांचे फळांमध्ये रूपांतर होते. अर्थात, यातील कोकोचे परागीभवन करणारा नेमका व महत्त्वाचा घटक कोणता, याविषयी फारशी माहिती अद्याप उपलब्ध नाही. गॉटिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी इंडोनेशियन वन विभागामध्ये केलेल्या प्रक्षेत्र चाचण्यांमध्ये कीटकनाशके, खतांचा वापर आणि हाताने केलेल्या परागीभवनामुळे पडणाऱ्या उत्पादनातील फरकांचा अभ्यास केला आहे. त्यात कोणत्याही रसायनांच्या (खते, कीटकनाशके) वापरापेक्षाही परागीभवनाचे महत्त्व लक्षात आले आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘जर्नल अॅग्रीकल्चर, इकोसिस्टिम्स अॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट’ मध्ये प्रकाशित केले आहेत.
कोको पिकाचे परागीभवन हे छोट्या माश्या, वास्प या किटकांमार्फत होते. कोकोचे परागीभवन करणारा नेमका व महत्त्वाचा घटक कोणता, याविषयी फारशी माहिती अद्याप उपलब्ध नाही. सामान्यतः किंवा नैसर्गिक स्थितीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक फुलांना किटक अजिबात भेट देत नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी या फुलांपासून फळ तयार होत नाही. कोकोची फायदेशीरता लक्षात आल्यानंतर कोकोची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. पुढे त्यात मोठ्या प्रमाणात रसायनांचाही वापर सुरू झाला. मात्र, रसायनांच्या वापरानंतरही अपेक्षित उत्पादन वाढ होत नसल्याचेच स्पष्ट होते. गॉटिंग्टन विद्यापीठातील संशोधक मॅन्युअल टोलेडो-हर्नान्डेझ, प्रा. तेजा त्शारत्के, प्रा, थॉमस सी. वांगर यांनी इंडोनेशियन ताडूलको विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह कोको झाडांचे हाताने परागीभवन करण्याचा प्रयोग केला. या प्रयोगामध्ये हाताने परागीभवन केलेल्या झाडांचे उत्पादन १६१ टक्क्याने वाढल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. माणसांच्या साह्याने परागीभवन करण्यासाठीचा खर्च विचारात घेतला तरी सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये ६९ टक्क्यांने वाढ झाली. अन्य एका प्रक्षेत्रामध्ये केलेल्या खते व कीटकनाशकांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये कोणताही फरक पडला नाही.