पाण्याची उपलब्धता किती आहे व ते किती पिकांना आपण देऊ शकतो हा भरपूर पावसाळ्यात किंवा कमी पावसाळ्यात पाण्याच्या व्यवस्थापनातील पहिला महत्त्वाचा टप्पा. इथेच नेमके शेतकरी चुकतात मराठवाड्यात पर्जन्यमान कमी असेल किंवा जास्त असेल, परंतु इथे असा जमिनीचा प्रकार आहे की ज्यामध्ये चांगली साथ मिळते. कापूस, तूर, मूग, उडीद व ज्वारी ही पिके भारतीय व मध्यम जमिनीत कमी पाण्याला चांगली साथ देतात.
प्रथम पायरी पाणी वाचवण्याची म्हणजे या पिकांची धूळ पेरणी. मुख्यतः पिकांची पेरणी जमिनीच्या पाणी वाहणार्या विरुद्ध दिशेने, परंतु पाणी साठविण्यासाठी सरी वरंबा करावा ज्यामध्ये जास्त ओल टिकून राहते. जास्त कोळपणी किंवा पाळीमुळे जमिनीत पाण्याचा ओलावा जास्त वेळ टिकून राहतो. पिकांची चांगली वाढ झाल्यावर पिकांच्या बुडाला वरंबा पाडल्यामुळे चांगली ओल टिकून राहते व त्यामध्ये मुळांची वाढ व्यवस्थित होते. एखाद्या वेळेस अति पाऊस पडला तर सरीमधून पाणी निघून जाते. आपण पिकांना पाणी देताना जिथे पिकांची एक लिटर पाण्याची गरज असते तिथे 19 लिटर पाणी वाया घालवतो.
सरी वरंबा पद्धतीत जमीन सपाट पाहिजे. खोल असल्यास सरी पाडणे अवघड जाते. प्रत्येक पिकामध्ये सर्या योग्य पाडाव्या लागतात. पाण्याचा प्रवाह योग्य सोडावा लागतो. अन्यथा सर्या फुटून पूर्ण पाणी इकडे तिकडे साचते व पिकांचा नाश होतो.
सध्याचे शेतकरी जे ड्रिप व स्प्रिंकलर वापरतात त्यामध्ये 50 ते 60 टक्के शेतकर्यांनी वापरायची म्हणून वापरली व काहींनी ती गुंडाळून ठेवली आहे. काहींनी सबसिडी मिळते म्हणून घेतली असे वाटते, परंतु पश्चिम महाराष्ट्रात शेतकर्यांनी द्राक्षे, डािंळंब व भाजीपाला प्रत्येक पिकासाठी ड्रिप वापरून उत्पन्न वाढवले.
स्प्रिंकलर पद्धत साधी आहे. मेन्टेनन्स खर्च कमी आहे. स्प्रिंकलरचा शेतात लांबी रुंदी व शेतीची उंची, पाणी उपलब्ध असल्यावर किती वेळ स्प्रिंकलर चालतील त्याप्रमाणे पिकांच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. स्प्रिंकलरमध्ये सर्वात जास्त फायदा म्हणजे कोणत्याही पिकाची पेरणी केल्यास उगवण शक्ती चांगली मिळते. जमिनीमध्ये योग्य पाणी देता येते. खताच्या मात्रा सुद्धा कमी लागतात.
प्रामुख्याने उन्हाळ्यात प्रखर उष्णतेत स्प्रिंकलर वापरताना पिकांचे कानाकोपर्यांत पाणी मिळत नाही त्यामुळे पिके वाळतात. हवेचा दाब जास्त असल्यास स्प्रिंकलर योग्य दिशेने न चालता हवेच्या झोकावर चालतात. त्यामुळे पाणी व्यवस्थापन होत नाही. योग्य प्रमाणात मोटारचा दाब न मिळाल्यास पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रमाणात होत नाही. पिके फुलोर्यात असल्यास फुलांचे परागीरकरण बरोबर होत नाही. काही पिकांमध्ये फुले खाली गळून जातात. तरी सुद्धा स्प्रिंकलरमध्ये 30 ते 40 टक्के पाण्याची बचत होते.
कोणताही डीलर शेतकर्याकडे आल्यावर शेतकरी म्हणतो की, इतक्या एकरावर ड्रिप बसवायचे किंवा आम्हाला ड्रिप करून द्या तेव्हा आम्हाला खर्च किती लागेल ते सांगा. फक्त हीच चर्चा सगळीकडे असते, परंतु शेतकर्यांनी स्वतःच ठरविले पाहिजे की आपल्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहे आपण किती एकरवर ड्रिप चालवू शकतो याचा आपण मेन्टेनन्स करून शकतो का या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ड्रिप घ्यायला पाहिजे.
ड्रिपमध्ये सर्वांत मोठी अडचण योग्य तंत्रज्ञानाची माहिती मिळत नाही. प्रत्येक मासिकात लेख जे येतात ते थिअरी स्वरुपात येतात, परंतु ड्रिप प्रॅक्टिकली जिथे सुरू आहेत तिथे पाहिल्यास चांगला अनुभव मिळतो. ड्रिप मटेरियल भारतात हलके असल्यामुळे उंदीर, ससे, कोल्हे, खडुळी हे मटेरियल कुरतडतात. मराठवाड्यामध्ये पाण्याचा पीएच कमी जास्त असल्यामुळे किंवा जास्त क्षार असल्यामुळे फिल्टरची सिस्टिम चांगली पाहिजे.
तुषार व ठिबक सिंचनाचा पुरेपूर प्रसार व प्रचार मराठवाड्यात अपेक्षेप्रमाणे झालेला नाही हा सर्वात मोठा दोष अद्यापही जाणकारांच्या लक्षात आलेला नाही. शेतीच्या आधुनिकीकरणाची ताकद आजही येथील शेतकर्यांना कमावता आलेली नाही. त्याची मानसिक धारणा सुधारण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर व व्यापक प्रयत्नांची गरज आहे.