कृषी विद्यापीठ, शेतकर्‍यांसाठी 2018 ठरले ऐतिहासिक वर्ष

0

2018 वर्ष हे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक वर्ष ठरले आहे. कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तिनही क्षेत्रात अनेक ऐतिहासीक घडामोडी घडल्या.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने विद्यापीठास पाच वर्षांसाठी दिलेली अधिस्वीकृती ही विद्यापीठातील शिक्षण क्षेत्रातील महत्वाची उपलब्धी आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. विद्यापीठास शैक्षणिक दर्जाच्या आधारे एकूण 4 पैकी 2. 77 मिळाले असून विद्यापीठाने ब दर्जा प्राप्त केला आहे. विद्यापीठातंर्गत असलेल्या परभणी, लातूर, बदनापूर, गोळेगाव, उस्मानाबाद व अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालये तसेच परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय व लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास अधिस्वीकृती प्राप्त झाली आहे. या महाविद्यालयातील सर्व पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या अधिस्वीकृतीस मान्यता देण्यात आली आहे. ही बाब विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यासाठी एक संजीवणीच ठरेल. यावर्षीच्या दीक्षांत समारंभात 3376 स्नातकांना विविध पदवींनी अनुग्रहीत करण्यात आले असून येणार्‍या काळात प्रशिक्षण मनुष्यबळाचे योगदान कृषी विकासात मोलाचे ठरणार आहे. संपूर्ण वर्षभरात विद्यापीठातील नियमित शैक्षणिक कार्यासोबतच क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध मान्यवरांची व्याख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यींचे व्यक्तीमत्व घडविण्यात फलदायी ठरले.

कृषी संशोधन
विद्यापीठाच्या कृषी संशोधनाचा विचार करता, मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे सोयाबीन, कापूस, ज्वारी व तूर हे मुख्य पिके आहेत. सोयाबीन व तूर या पिकांमध्ये यापूर्वीच विद्यापीठाने विकसित केलेली अनेक वाणं शेतकर्‍यांच्या शेतात चांगल्या प्रकारे स्थिरावली आहेत. यात मुख्यत: सोयाबीन मधील एमएयूएस-158, एमएयूएस-71, एमएयूएस-162 यांचा तर तूर पिकातील बीएसएमआर-736, बीएसएमआर-853, बीडीएन-711 आदींचा उल्लेख करावा लागेल. मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे नगदी पीक कापूस संशोधनही विद्यापीठाच्या दृष्टीने ऐतिहासीक ठरले. विद्यापीठाचा नांदेड-44 (एनएचएच-44) हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाणात परावर्तीत करण्यात आला. विद्यापीठ अंतर्गत असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रातून 1984 साली विकसित झालेला कपाशीचा नांदेड-44 हा संकरित वाण कपाशीचे बीटी वाण येण्यापूर्वी अधिक उत्पादन देणारा, पूनर्बहाराची क्षमता असलेला व रसशोषण करणार्‍या कीडींना प्रतिकारक असल्यामुळे मराठवाडा, राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी प्रचलित होता. हा वाण जनुकीय परावर्तनासाठी म्हणजेचे बीटीमध्ये परावर्तीत करण्यासाठी मार्च 2014 मध्ये वनामकृवि. आणि महाबीजमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. चार वर्षात हा वाण बीटीमध्ये परावर्तीत करण्यात येऊन यशस्वी प्रक्षेत्र चाचण्याही घेण्यात आल्या. पुढील हंगामात तो मर्यादित स्वरूपात महाबीजच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांमध्ये असलेली मागणी पूर्ण होऊ शकली. याचा सार्थ अभिमान विद्यापीठ शास्त्रज्ञांना आहे.
ज्वारी हे पीकही मराठवाड्यातील एक महत्वाचे पीक आहे. यातही 2018 या वर्षात एक ऐतिहासिक उपलब्धी झाली. विद्यापीठ आणि हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्ध कोरडवाहू उष्ण कटिबंधीय पीक संशोधन संस्था, (इक्रीसॅट) यांच्या संशोधन सहभागातून परभणी शक्ती या लोह आणि जस्ताचे अधिकतम प्रमाण असणार्‍या खरीप ज्वारीचा जैवसमृध्द वाण विकसित करण्यात आला. देशातील हा ज्वारीचा पहिला वाण ठरला आहे. सदरिल वाणाचे दि. 5 जुलै रोजी इक्रीसॅट हैद्राबाद येथे समारंभपूर्वक प्रसारण करण्यात आले. या वाणात लोह व जस्ताचे अधिक प्रमाण असल्यामुळे मानवी जीवनावर आणि आरोग्यावर याचा चांगला परिणाम होणार आहे.

शरीरातील रक्तातील लोहाच्या कमरतेमुळे अनेक व्यक्तींमध्ये रक्तक्षय मोठ्या प्रमाणात आढळतो, तसेच गर्भवती महिला व आदिवासी मुलांसाठी हा वाण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यात लोह प्रती किलो 44 ते 46 मिलीग्रॅम तर जस्त प्रती किलो 32 ते 33 मिलीग्रॅम असून भाकरीची प्रत चांगली आहे. या ज्वारीचा कडबाही उच्च प्रतीचा आहे. उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी ज्वारीचे 36 ते 38 क्विंटल, कडब्याचे उत्पादन 105 ते 110 क्विंटल आहे. हा वाण खोडमाशी, खोडकीड व काळ्या बुरशी रोगास प्रतिकारकक्षम आहे. यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आहारात पुन्हा एखाद्या ज्वारीचे महत्व वाढणार आहे. याशिवाय बाजरी संशोधनातील महत्वाच्या घटनेचा उल्लेख करावा लागेल. औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या अखिल भारतीय समन्वयीत बाजरी संशोधन प्रकल्पास सन 2017-18 साठी उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी सर्वोकृष्ट संशोधन केंद्र म्हणून सन्मानीत करण्यात आले. बाजरी संशोधन प्रकल्प केंद्राने जैवसमृध्द लोहयुक्त एएचबी-1200 व एएचबी-1269 ही दोन वाणं विकसित केली असून या वाणांची राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणार्‍या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात संपन्न झालेल्या 46 व्या बैठकीत परभणी कृषी विद्यापीठाच्या खरीप ज्वारी, देशी कापूस, चिंच आदी पिकांचे प्रत्येकी एक नवीन वाण, चार कृषी यंत्रे आणि 28 पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशींना मान्यता देण्यात आली.

विद्यापीठाचे विस्तार कार्य नियमितपणे विविध मेळावे, प्रशिक्षण, चर्चासत्र, शास्त्रज्ञांच्या प्रक्षेत्र भेटी, माहिती वाहीनी आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात आले. परंतु यावर्षी विशेष ठरले ते कापसावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत राबविण्यात आलेली मोहिम. मागील वर्षी निर्माण झालेल्या कापसावरील गुलाबी बोंडअळीचा धोका यावर्षी उद् भवू नये, या हेतूने महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व विद्यापीठाच्या विस्तार यंत्रणेच्या वतीने विविध विस्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे निश्‍चितच शेतकरी बांधव गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण कमी फवारणीत व कमी खर्चात करू शकले. या मोहिमेत मराठवाडा विभागातील विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयाचे 7 व्या सत्रातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (रावे) चे विद्यार्थ्यांनी मोलाचा सहभाग नोंदविला. ही मोहिम विद्यापीठांतर्गत असलेल्या मराठवाड्यातील एकूण 27 घटक व संलग्न कृषी महाविद्यालयातील 2280 विद्यार्थ्यांनी तीनशेपेक्षा जास्त गावांपर्यंत पोहचली हे विशेष.
यावर्षी विद्यापीठांतर्गत बदनापूर येथे नवीन कृषि विज्ञान केंद्राची सुरूवात करण्यात आली, याचे उद्घाटन ऑनलॉइन पध्दतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे जालना जिल्ह्यातील विद्यापीठाच्या विस्तार कार्यास बळकटी प्राप्त होणार आहे.

या वर्षातील आणखी एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख करावा लागेल, ती म्हणजे विद्यापीठाचे 17 वे कुलगुरू म्हणून कोरडवाहु शेती संशोधनातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलू यांनी कुलगुरू म्हणून 31 मे रोजी 4 वर्ष 4 महिने कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला. विद्यापीठाचे 18 वे कुलगुरू म्हणून डॉ. अशोक ढवण यांनी दि.1 जून रोजी पदभार स्वीकारला. येणार्‍या काळात निश्‍चितच कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेती, शेतकरी व विद्यार्थ्यी यांच्या हिताचे उत्कृष्ट कार्य होईल, यात शंकाच नाही.

संपूर्ण वर्षभरातील विद्यापीठाच्या यशस्वी प्रवासात निश्‍चितच अनेकांचे योगदान आहे, यात माननीय कुलगुरू पासुन ते शेतकरी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यी, प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी यांचाही वाटा आहे. माजी कुलगुरू मा. डॉ. बी व्यंकटेश्वरलु, सद्याचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, विद्यापीठाचे कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषि विस्तारक व विद्यार्थ्यी यांचा उल्लेख करावाच लागेल.

-डॉ. प्रवीण कापसे,
जनसंपर्क अधिकारी, वनामकृवि, परभणी

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.