सेंद्रीय शेतीसाठी कृषी विद्यापीठाचे तांत्रिक पाठबळ आवश्यक

0

परभणी / प्रतिनिधी
आज मानवाच्या चांगल्या आरोग्यासाठी रसायनमुक्त अन्नाची गरज आहे. त्यासाठी सेंद्रीय शेतीचा कास आपणास धरावी लागेल. सेंद्रीय शेतीत जमिनीतील उपयुक्त जीवाणू महत्वाचे असून त्यांच्याशिवाय शेती शक्य नाही. सेंद्रिय शेतीमध्ये शाश्‍वतता आणण्यासाठी जमिनीतील जैविक, रासायनिक व भौतिक गुणधर्म समतोल राखणे गरजेचे आहे. संशोधनाच्या आधारे विद्यापीठाचे सेंद्रीय शेतीस तांत्रिक पाठबळ आवश्यक असल्याचे प्रगतशील शेतकरी सोपानराव आवचार यांनी सांगितले. शेतकर्‍यांनी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन सेंद्रीय उत्पादन घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी जिल्हानिहाय दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रृंखलेतील लातूर जिल्हयासाठीच्या शेतकर्‍यांकरिता प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन उपसंचालक डॉ. ए. एस. जाधव होते तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रगतशील शेतकरी सोपानराव आवचार हे उपस्थित होते. तसेच कृषीविद्या विभागाचे प्रमुख डॉ. डब्ल्यू. एन. नारखेडे, पशुशक्तीचा योग्य वापर योजनच्या प्रभारी अधिकारी डॉ. एस. एन. सोलंकी, डॉ. आर. एन. खंदारे, सेंद्रीय शेतीतज्ञ अनंत बनसोडे, कुशा शर्मा, डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय समारोपात डॉ. ए. एस. जाधव म्हणाले की, देशाची प्राथमिकता लक्षात घेऊन कृषी संशोधन करण्यात आले आहे, देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाल्या नंतर दर्जेदार शेती उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे सेंद्रीय शेतीची गरज लक्षात घेता विद्यापीठाने सेंद्रीय शेती संशोधन हाती घेतले असल्याचे सांगितले. डॉ. आर. एन. खंदारे यांनी सेंद्रीय कर्ब हा जमिनीचा आत्मा असुन चिरकाळ जमिनी उपजाऊ ठेवण्यासाठी सेंद्रिय अन्नद्रव्यांचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले तर डॉ. एस. एन. सोलंकी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेती बैलचलीत औजारांचा कार्यक्षम उपयोग केला तर मजुरावरील खर्च कमी होऊन पिक लागवड खर्चात बचत होईल.

प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचलन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. तांत्रिक सत्रामध्ये डॉ. डब्लू एन नारखेडे यांनी सेंद्रीय पिक लागवड तंत्रज्ञान, डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी सेंद्रीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, अनंत बनसोडे यांनी मृदा आरोग्य व्यवस्थापन, डॉ. आर. व्ही. चव्हाण यांनी सेंद्रीय बाजारपेठ व्यवस्थापन, डॉ. नितीन मार्कंडेय यानी सेंद्रिय शेतीमध्ये पशुधनाचा कार्यक्षम वापर, डॉ. एस. एन. सोलंकी यांनी सेंद्रिय शेतीमध्ये पशुशक्तीचा योग्य वापर आणि डॉ. ए. एल. धमक यांनी जैविक खताची निर्मिती व उपयोग तसेच जैविक खते निर्मिती केंद्रास शेतकर्‍यांची भेट घेवून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

सदरिल सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन मराठवाडयातील जिल्हयातील शेतकर्‍यांसाठी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमास लातूर जिल्हयातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनील जावळे, शीतल उफाडे, व्दारका काळे, सतीश कटारे, सचिन रणेर, प्रसाद वसमतकर, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.