पिकांच्या सद्याच्या अवस्थेनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला

0

गहु-दाणे भरणे अवस्था
गहु पिकास दाणे भरणे या अवस्थेत तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

हरभरा-काढणी अवस्था
वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी.

करडई-दाणे भरणे अवस्था
करडई पिकास दाणे भरणे या अवस्थेत तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

ऊस-लागवड
हंगामी ऊस पिकाची बेणे प्रक्रिया करूनच लागवड करावी.

संत्रा किंवा मोसंबी- फुलोरा किंवा फळवाढीची अवस्था
संत्रा किंवा मोसंबी बागेत आंबेबहार सध्या फुलोरा अवस्थेत तर मृगबहार फळवाढीच्या अवस्थेत आहे. अशा अवस्थेतील बागेस पाणी व्यवस्थापन करावे.

डाळिंब-काढणी अवस्था
फुले लागल्यापासून फळे तयार होण्यास जातीनुसार सुमारे 135 – 180 दिवसांचा कालावधी लागतो. फळे तयार झाल्यानंतर त्याचा गोलाकारपणा कमी होऊन फळांच्या बाजूवर चपटेपणा येतो. फळ दाबल्यास सालीचा विशिष्ट करकर आवाज येतो. अशा स्थितीत फळांची काढणी करावी.

फुल शेती-वाढीची अवस्था
मोगरावर्गीय फुलपिकाच्या चांगल्या वाढ व उत्पाादनासाठी प्रति झाडास प्रत्येक वर्षी 10 ते 15 किलो शेणखत द्यावे. छाटणीनंतर 100 ग्रॅम नत्र, 100 ग्रॅम स्फुरद व 100 ग्रॅम पालाश यांपैकी संपूर्ण स्फूरद, पालाश व नत्राची अर्धी मात्रा देऊन झाडांना भरपूर पाणी द्यावे.

भाजीपाला लागवड-उन्हाळी भेंडीची लागवड शक्यतो 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. लागवड सरी-वरंबा पध्दतीने करावी. लागवडीचे अंतर 30 बाय 15 सेंमी ठेवावे. बियाण्यांचे प्रमाण 12 ते 15 किलो प्रती हेक्टरी असावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात थायरम बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया करावी. लागवडीसाठी परभणी क्रांती, अर्का अभय, अर्का अनामिका, फुले उत्कर्षा, फुले किर्ती, पुसा सावनी इत्यादी सुधारीत जातींची निवड करावी.

चारा पिके लागवड-
पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी हंगामात चारा पिकांच्या लागवडीसाठी पूर्वमशागतीची कामे करावीत. ज्वारीसाठी मध्याम, बाजरीसाठी हलकी ते मध्यम तर मका व ओट या चारा पिकाच्या लागवडीसाठी मध्यीम ते भारी जमिनीची निवड करावी.

तुती रेशीम उद्योग-तुतीबागेत केसाळ अळी (बिहार हेअरी कॅटर पिलर) याचा प्रादुर्भाव हिवाळ्यात जाणवतो. पानांवर पुंजक्यात 200 ते 300 अळ्या अंड्यातून फुटून बाहेर येतात व पानांवर उपजिविका करतात. यामुळे पानांची चाळणी झालेली दिसते. याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशक न फवारता भौतिक पध्दतीने म्हणजे हाताने प्रादुर्भावग्रस्त पाने तोडावेत व अळ्या रॉकेलमध्ये बुडवून नियंत्रण करावे.

सौजन्य ःवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समिती.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.