पिकांच्या सद्याच्या अवस्थेप्रमाणे कृषी तज्ज्ञांचा सल्ला

0

कापूस -वेचणी अवस्था
कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर पिकांचा पालापाचोळा, पर्‍हाट्या यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी.

तूर-काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करून मळणी करून घ्यावी.

मका- वाढीची अवस्था
मका पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झामि 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के 50 मिली प्रती एकर याप्रमाणात फवारणी करावी.

रब्बी ज्वारी-दाणे भरणे अवस्था
रब्बी ज्वारीवर माव्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 ईसी 200 मिली प्रती एकर फवारणी करावी.

हळद-कंद वाढीची अवस्था
हळद पिकास 5 किलो पोटॅश प्रती एकरी ठिबकव्दारे द्यावे.

केळी-वाढीची अवस्था
थंडीमुळे केळी पिकाची पाने पिवळी पडून वाळतात. यावर उपाय म्हणून रात्रीच्या वेळी व पहाटे केळीच्या बागेत व बांधावर काडी कचर्‍याचा धूर करून वातावरणात उष्णता निर्माण करावी. जुन्या कांदे बागेमधील फळ वाढीच्या अवस्थेतील घड हे कोरड्या केळी पानांनी किंवा 2 ते 6 टक्के सछिद्रतेच्या 100 गेज जाडीच्या पांढर्‍या प्लास्टिक पिशवीने झाकावे. थंडीमुळे केळी पिकाच्या मुळांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते. यामुळे पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्य न मिळाल्याने केळी पिकाची पाने पिवळी पडू लागतात. झाडे पिवळी पडू नये म्हणून थंडीच्या काळात प्रमुख अन्नद्रव्याचा तात्काळ पुरवठा होण्यासाठी केळी बागेवर 19:19:19 किंवा 13:00:45 (20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) या विद्राव्य खताची फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास बागेस बांगडी पध्दतीने पाणी द्यावे.

आंबा-मोहर ते फुलधारणा
आंबा फळबागेस थंडीपासून संरक्षणासाठी पहाटे पाणी द्यावे.

द्राक्ष-घड वाढीची अवस्था
द्राक्ष बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी द्राक्षाचे घड पेपरने झाकून घ्यावेत. तसेच बागेस पहाटे पाणी द्यावे.

भाजीपाला-वाढीची अवस्था
भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी भाजीपाला पिकास पाणी द्यावे. कोरड्या जमिनीत उष्णता धरून ठेवण्यााची क्षमता कमी असते. त्यामुळे वातावरणातील गारठ्याचा परिणाम भाजीपाला पिकावर होतो.

फुलशेती-वाढीची अवस्था
थंडीमध्ये गुलाब पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डिनोकॅप किंवा डायफेनोकोनॅझोल 0.5 मिली प्रती लिटर पाण्याात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम उदयोग-बाल्य रेशीम किटकसंगोपन गृहात तापमान 22 ते 28 अंश सेल्सिअस व आर्द्रता 80 ते 85 टक्के मर्यादीत ठेवणे आवश्यक आहे. रेशीम किटकसंगोपन गृहात लाईटचे बल्ब (फोकस) न लावता कोळशाच्या 5 शेगडीचा वापर करावा. रेशीम किटकसंगोपन गृहात धूर होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन-थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी जनावरे रात्री गोठ्यामध्येच बांधावीत. शेळ्यांच्या तसेच कोंबड्यांच्या शेडला बारदाण्यााचे पडदे लावावेत. त्यामुळे पहाटेच्या थंड वार्‍यापासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबड्यांच्या शेडमध्य बल्ब किंवा गॅस ब्रुडर लावावेत. शेळ्या-मेंढ्यांमध्ये तोंडाचा मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास यावर उपाय म्हणून प्रथम पोटॅशियम परमँग्ने्टच्या द्रावणाने तोंड धुवून घ्यावे. तोंडास बोरोग्लीसरीन लावावे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.