रब्बी ज्वारी-दाणे भरणे अवस्था
रब्बी ज्वारीवर माव्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 ईसी 200 मिली प्रती एकर फवारणी करावी.
केळी-वाढीची अवस्था
किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास केळीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. केळी पिकाची पाने पिवळी पडून वाळतात. यावर उपाय म्हणून रात्रीच्या वेळी व पहाटे केळीच्या बागेत व बांधावर काडी कचर्याचा धूर करून वातावरणात उष्णता निर्माण करावी. जुन्या कांदेबागेमधील फळ वाढीच्या अवस्थेतील घड हे कोरड्या केळी पानांनी किंवा 2 ते 6 टक्कें सछिद्रतेच्या 100 गेज जाडीच्या पांढर्या प्लास्टिक पिशवीने झाकावे. थंडीमुळे केळी पिकाच्या मुळांची अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्रिया मंदावते. यामुळे पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्य न मिळाल्याने केळी पिकाची पाने पिवळी पडू लागतात. झाडे पिवळी पडू नये म्हणून थंडीच्या काळात प्रमुख अन्नद्रव्याचा तात्काळ पुरवठा होण्यासाठी केळी बागेवर 19:19:19 किंवा 13:00:45 (20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) या विद्राव्य खताची फवारणी करावी.
आंबा-मोहर ते फुलधारणा धरणे
किमान तापमानात झालेल्या घटीमुळे आंबा फळबागेत फुलधारणा होण्यास उशिर होतो. यावर उपाययोजना म्हणून बागेत रात्रीच्या वेळी धूर करावा. जेणेकरून बागेतील तापमान वाढण्यास मदत होईल.
द्राक्ष-घड वाढीची अवस्था
किमान तापमानात झालेल्या घटीमुळे द्राक्ष बागेत मण्यामध्ये पाणी भरण्याच्या स्थितीत सकाळी थंडी वाढल्यास मण्याचे क्रॅकिंग होऊ शकते. क्रॅकिंग झाल्यामुळे मण्यांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात.
भाजीपाला-वाढीची अवस्था
भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी भाजीपाला पिकास पाणी द्यावे. कोरड्या जमिनीत उष्णता धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे वातावरणातील गारठ्याचा परिणाम भाजीपाला पिकावर होतो.
फुलशेती-वाढीची अवस्था
थंडीमध्ये गुलाब पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्यााची शक्यता असते. त्याासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डिनोकॅप किंवा डायफेनोकोनॅझोल 0.5 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुती रेशीम उद्योग-
किटक संगोपन गृहात कोळश्याची शेगडी किंवा इलेक्ट्रीक हिटर वापरून तापमान 22 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील याची दक्षता घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन- थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी जनावरे रात्री गोठ्यामध्येच बांधावित. शेळ्यांच्या, तसेच कोंबड्यांच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे. त्यामुळे पहाटेच्या थंड वार्यापासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबड्याच्या शेडमध्ये बल्ब किंवा गॅस ब्रुडर लावावेत. शेळ्या मेंढ्यामध्ये तोंडाचा मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास यावर उपाय म्हणून प्रथम पोटॅशियम परमँग्नेतटच्या द्रावणाने तोंड धुवून घ्यावे. तोंडास बोरोग्लीसरीन लावावे.