राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली विजेची मागणी लक्षात घेता वीजनिर्मितीचे पर्यायी, शाश्वत स्रोत निर्माण करणे व नैसर्गिक स्रोतांपासून वीजनिर्मिती करणे आवश्यक झाले आहे. पारंपरिक वीज वापरात बचत करणे, हे लक्षात घेऊनच राज्यात अटल सौर कृषी पंप योजने अंतर्गत 7000 सौर कृषी पंप वाटपास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यासाठी 239 कोटी 92 लाख रुपये खर्च येणार असून आणखी एक लाख सौर कृषी पंप देण्याची योजना तयार करण्यासाठीही यावेळी मान्यता देण्यात आली आहे.
शेतीसाठी कृषी पंपांना वीजपुरवठा करण्यात येणार्या अडचणी लक्षात घेऊन शेतकर्यांना सुमारे साडे पाच हजार सौर कृषीपंप प्रायोगिक तत्वावर देण्यात आले होते. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर आता सात हजार सौर कृपीपंप देण्यात येणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निधीतून शेतकर्यांना हे सौर कृषी पंप देण्यात येतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. ही संपूर्ण योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येणार असून त्यासाठी लाभार्थींंना महाऊर्जा कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. या शिवाय राज्य शासनाद्वारे राज्यात 1 लाख सौर कृषी पंप आस्थापित करण्याकरिता नवीन योजना तयार करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती/जमाती लाभार्थींसाठी विशेष योजना तसेच आदिवासी उपयोजना अंतर्गत निधीमधून वापर करून सौर कृषी पंप योजना तयार करण्यास मंजूरी देण्यात आली.
सौर कृषी पंपांपैकी 25 टक्के पंप हे 3 एचपी क्षमतेचे असून त्याची किंमत सुमारे 2 लाख 40 हजार रुपये आहे. पण यावर अनुदान देण्यात येणार असल्यामुळे शेतकर्यांना सुमारे 12 ते 12 हजार 500 रुपयांमध्ये देण्यात येईल. 75 टक्के पंप हे 5 एचपी क्षमतेचे असतील. त्याची किंमत सुमारे तीन लाख 25 हजार रुपये आहे. यावरही अनुदान देण्यात येणार असून हे कृषी पंप शेतकर्यांना सुमारे तीस हजार रुपयांना उपलब्ध होतील. त्यानुसार 3 अश्वशक्तीचे 1750 पंप व 5250 पंप 5 अश्वशक्तीचे देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेत 5 टक्के हिस्सा लाभाथ्याला भरावा लागणार आहे. 95 टक्के निधी केंद्र आणि राज्य शासनाचा राहील. 3 व 5 अश्वशक्ती पंपांच्या एकूण उद्दिष्टांपैकी 22.5 टक्के पंप अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित 77.5 टक्के पंप सर्वसाधारण वर्गाच्या लाभार्थींसाठी राहतील.
दुर्गम भागाला फायदा
दुर्गम भागात वीजपुरवठा करण्यासाठी खूप खर्च येतो. पण सौर कृषी पंपांमुळे ठाणे, पालघर, मेळघाट, गडचिरोली भागातील शेतकर्यांना फायदा होईल. सौर कृषी पंपामुळे शेतकर्याला दिवसाही सिंचन करता येईल. या सौर कृषी पंपांमुळे सुमारे 14 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
दहा वर्षांची गँरेटी
सौर कृषीपंप पुरवठ्याचे टेंडर काढण्यात येतील. कृषी पंपाचा हमी कालावधी (गॅरेंटी) पाच वर्षांची तर सोलर पॅनेलसाठी दहा वर्षांसाठी हमी पुरवठादाराला द्यावी लागेल. तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी पाच वर्षांसाठी पुरवठादारासोबत करार होईल
1 लाख सौर कृषी पंपाची योजना
राज्य सरकारच्यावतीने 1 लाख सौर कृषी पंप देण्याच्या योजनेलाही मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी राज्य सरकार सुमारे 36 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!