दोन एकरात 6 लाखांचे उत्पन्न

0

थाय 7 पेरूच्या कलमांना देशभरातून मागणी
औरंगाबाद
पारंपरिक शेतीतील सततच्या नापिकीचा सामना करत अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन सुधारित शेतीकडे वळले आहेत. कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळविणार्‍या पिकांकडे वळल्याने आर्थिक उत्पन्नात भरभराट तर होत आहेच शिवाय इतर शेतकर्‍यांनाही यामुळे नवीन मार्ग सापडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याच्या अकोला येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग तात्या आसबे याचेच उदाहरण आहे. त्यांच्या 35 एकरातील रुख्मिणी फार्ममध्ये 2 एकरमध्ये फुलवलेली थाई 7 पेरूबाग सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
पारंपारिकतेने आलेल्या 35 एकर शेतीमध्ये आसबे पारंपारीक पिके घेत होते. गहू, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन तसेच भाजीपाला पिकांना जोपासण्यात त्यांची पुरेवाट व्हायची. पावसाचा लहरीपणा, सततची नापिकी, शासनाकडून पिकांना मिळणारा तुटपुंजा हमीभाव यामुळे आसबे यांच्या हातात जेमतेम उत्पन्न पडत होते. यावर उपाय म्हणून त्यांनी विविध पर्यायांची चाचपणी केली आणि फळबाग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातही कमी पाण्यात तग धरून जास्त उत्पन्न देणारे फळ निवडावे यावर भर देत त्यांनी डाळिंब, एपल बोर, ड्रॅगन फ्रुट निवडले. ही बाग चांगली बहरली. चांगले उत्पन्नही सुरु झाले. अशातच आसबे यांना थाई 7 जातीच्या पेरूची माहिती मिळाली. आकाराने मोठे, वजनदार, चविष्ट अशा पेरूला आपल्याकडे लावण्याचा त्यांनी निर्धार केला. थाय 7 पेरू हे आपल्याकडे जास्त लावले जात नाहीत. त्याच्या कलमाही मिळत नाहीत. यासाठी त्यांनी 2012 साली पश्चिम बंगाल येथून थाय 7 पेरूची 400 रोपे आणली. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर एक एकर शेतामध्ये ही रोपे लावली. ऑक्टोबर – नोव्हेंबर ते जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान याचा तोडणीचा हंगाम असतो. पहिल्या वर्षी पाच टन माल निघाला. यातून अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न हाती पडले. तर दुसर्‍या वर्षीपासून अंदाजे दहा टन तोडणीतून अंदाजे पाच ते सहा लाखांपर्यंतचे उत्पन्न आसबे घेत आहेत. पारंपरिक शेतीला जीवापाड जोपासावे लागते. शिवाय बाजारपेठेतही योग्य हमीभाव नसल्याने समाधानकारक उत्पन्न हाती येत नाही. यावर पांडुरंग आसबे यांची थाय 7 पेरूची फळबाग शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

स्वतः केले कलम विकसित
थाय 7 पेरूचे उत्पन्न पाहता इतर शेतकरी बांधवांनाही याचा लाभ व्हावा यासाठी आसबे यांनी आपल्या शेतीतच या जातीची कलमे तयार करण्याचे ठरविले. यासाठी ड्राफ्टिंग तंत्रज्ञानाने शेतातच कलम विकसित केल्या. प्रति कलम 110 रुपये दराने रोपे विकली जातात. महाराष्ट्रासह, उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यातून शेतकरी आसबे यांच्याकडे कलमांसाठी येतात.

अंदाजे 500 ग्रॅम वजनाचे फळ
सर्वसाधारण पेरूपेक्षा थाय 7 पेरूची प्रजाती सुधारित आहे. याचे प्रत्येक फळ अंदाजे 500 ग्रॅमच्या आसपास आहे. साधारण स्थानिक पेरू 20 ते 50 रुपये प्रतिकिलोने विकले जातात परंतु थाय 7 पेरूची विक्री 50 ते 90 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दराने विक्री होते. चवीला गोड आणि आरोग्यदायी असल्याने चोखंदळ ग्राहक मागणी करतो.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.