गडचिरोली : कोरोना संचारबंदीमुळे देशासह राज्यातही उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायच सर्वाना तरुण नेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय आढावा बैठकीत केले.
संचारबंदीमुळे मोडकळीस आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येईल यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेती व बिगरशेती व्यवसायांना चालना देण्यासाठी काय-काय करता येईल, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कृषी सभापती रमेश बारसागडे, जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
खरीप हंगामाअगोदर पालकमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील पाऊस जास्त आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याचा फायदा घेवून शेतकऱ्यांना विविध आर्थिक व शास्त्रीय पाठबळ देवून चांगल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे ना.वडेट्टीवार म्हणाले.
बोअरवेलच्या गाड्यांना वाहतुकीसाठी परवानगी
उन्हाळयाच्या पाशर््वभूमिवर जिल्ह्यात गरजू लोकांना पाण्याची उपलब्धता वेळेत होण्यासाठी बोअरवेलच्या गाडयांना तातडीने परवानगी देण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
आठवड्यातून ५ दिवस कापूस खरेदी
चामोर्शी येथील कापूस खरेदी केंद्रावर आठवडयातील दोनच दिवस कापूस खरेदी सुरू आहे. परंतू आता आठवड्यातील ५ दिवस ही खरेदी सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक कापूस तपासणी ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर केल्या.