शेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद
नवी दिल्लीः लॉकडाऊनमुळे अनेक शेतीकामे ठप्प असूनही आगामी आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकासात शेतीचीच भूमिका महत्वाची राहणार असल्याचा विश्वास निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केला. कोरोना संकटाचा मोठा फटका देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला बसणार असला तरी त्याची फारशी झळ शेतीला लागणार नाही. सकल राष्ट्रीय उत्पन्नात १६ टक्के हिस्सा असणारे आणि ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला रोजगार देणारे शेती क्षेत्र आर्थिक संकटात साडलेल्या अर्थव्यवस्थेला तारून नेईल, असेही ते यावेळी म्हणाले.
कोरोना महामारीच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आली आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होत आहे. परंतु या संकटाच्या काळातही अनेक राज्यांमध्ये शेतीची कामे तुलनेने सुरळीत सुरु असून आगामी काळात शेती क्षेत्राचा विकास दर चांगला राहील आणि शेती देशाच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडेल, असे केंद्र सरकारला वाटते आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत सन २०१९-२० मध्ये अन्नधान्य उत्पादनात दोन टक्के वाढ होऊन २९८.३ दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित. खरिपात १४९.९२ दशलक्ष टन तर रब्बीत १४८.४ दशलक्ष टन उत्पादन होणार आहे. पुढीस हंगामात अन्नधान्याव्यतिरिक्त तेलबिया आदी पिकांचे उत्पादन वाढण्याची सरकारला अपेक्षा आहे. लोकांच्या व्यक्तिगत खर्चात कपात झाली तरी शेती उत्पादनांवर परिणाम होणार नाही. देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे. प्रवासी वाहतुकीसाठीच्या वाहनांची विक्री शून्यावर असतान महिंद्रा ॲन्ड महिंद्राकडून एप्रिलमध्ये ४ हजार ७१६ ट्रॅक्टरची विक्री करण्यात आली आहे. या काही बाबी शेतीसाठी साकारात्मक आहे.