राज्यात वादळी पावसाची शक्यता

0

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून किमान तापमान वाढल्याने रात्रीच्या वेळी उकाडा जाणवत आहे. मालेगाव येथे देशातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोकण वगळता राज्याच्या विविध भागात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. विदर्भ, मराठवाड्यात सर्वच ठिकाणी ऊन तापदायक ठरत असून, मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भापासून तेलंगाणा, रायलसीमा, तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज शुक्रवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.