राज्यात उष्ण, दमट हवामानाची शक्यता
जळगाव : गेल्या काही दिवसात राज्यातील तापमानाच्या पाऱ्याची पातळी वाढत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव, मालेगाव, परभणी, सोलापूर येथे ४० अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी हवामान मुख्यत: उष्ण व दमट राहणार असून मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मध्यप्रदेश व विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रापासून केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आज (ता.६) हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.