पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
भंडारा : दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी सावकाराच्या कर्जासाठी सावकारांकडे जात आहे. कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मागील कर्जमाफी योजनेतील त्रुटींचे निराकरण करुन महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांना द्यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. चुकीच्या माहितीच्या आधारे शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये. त्याअनुषंगाने पीक कर्जाची माहिती संबंधित यंत्रणेने अपडेट करावी, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषद सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्जाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनिल मेंढे, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यावेळी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
आतापर्यंत ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना सातबारा मिळत नसल्याचे निदर्शानास आले आहे असे नमूद करून पटोले म्हणाले, शेतीचा सामायिक सातबारा असल्यासच रिव्हेन्यु स्टॅम्प लागतो. ऑनलाईन सातबाराची सुलभ सुविधा असूनही शेतकऱ्यांना सातबारा मिळत नाही. यानंतर शेतकऱ्यांकडून सातबारा मिळत नाही अशा तक्रारी येता कामा नये. सेवा सहकारी संस्थांनी डिमांड बँकेकडे पाठवावी. नाबार्डची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १८ हजार ५०० प्रमाणे कर्ज देण्यात येते. तेच प्रमाण चंद्रपूर जिल्ह्यात प्रती हेक्टरी २० हजार आहे. धान उत्पादक जिल्हा असून ही तफावत कशी याबाबत जिल्हास्तरीय समितीने अहवाल सादर करावा असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज कसे देता येईल, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. अपुऱ्या कर्जाच्या रक्कमेमुळे शेतकरी सावकाराच्या जाळ्यात फसतात ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी धानाचा रेश्यो वाढवा. बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना अपूरे पडत आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज तसेच सुविधा कशा देता येईल याकडे लक्ष दया. शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करण्याची खबरदारी घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष यांनी सांगितले.
जिल्ह्यात शेतकरी सभासदाची संख्या २ लाख २२ हजार आहे. १ लाख ७० हजार शेतकरी सभासदांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. या वर्षी जिल्ह्याला ४२६.२५ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेला २६० कोटी, राष्ट्रीयकृत बँक ११८.५० कोटी, ग्रामीण बँक ३२ कोटी व खाजगी बँकेस १५.७५ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ९८ हजार सभासद असून ५७ हजार सभासदांना कर्ज वाटप करण्यात आल्याचे देशकर यांनी सांगितले.