जळगाव : कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्वच निर्यात पूर्णपणे थांबली होती. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे देखील मोठे नुकसान होत होते. मात्र, ३० मार्चपासून निर्यात पुन्हा सुरू झाली असून तीन दिवसांत ६८ कंटेनरद्वारे जवळपास एक हजार २० टन द्राक्ष निर्यात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे वाहतूक सुविधा बंद झाल्याने निर्यात ठप्प झाली होती. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. शासनाने पुढाकार घेऊन अत्यावश्यक सेवेमध्ये फळे व भाजीपाल्याचा त्याचबरोबर खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल यांचाही समावेश केला. याशिवाय निर्यातीसाठी आवश्यक असलेले कंटेनर चालू ठेवण्याचे आदेश दिले. तसेच मुंबईतील जेएनपीटी बंदर सुद्धा सुरू करण्याचे नियोजन केले. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा मिळाला आहे.
कृषी विभाग, अपेडा, निर्यातदार संस्था आणि एनआरसी ग्रेप यांच्यामार्फत संबंधित विभागाच्या पुढाकाराने निर्यात सुरू झाली आहे. त्यामुळे १ एप्रिलपर्यंत युरोपला ७९ हजार ५०० टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. निर्यात सुरू झाल्यानंतर ३० मार्च रोजी द्राक्षाचे ३८ कंटेनर युरोपला पाठविण्यात आले. तर ३१ मार्चला १९ तर एक एप्रिलला ११ असे एकूण ६८ कंटेनर द्राक्ष निर्यात झाली आहे.