जळगाव : राज्यात १ मे पासून कापूस बियाणे विक्रीचा निर्णय कृषी विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोचल्यानंतर पूर्वहंगामी कापूस लागवड रोखणे शक्य होणार नसल्याची जाणीव झाल्यानंतरच निर्णय मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचा गेल्या अनेक वर्षातील अनुभव आहे. याच कारणामुळे राज्य सरकारला शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक भरपाई देखील द्यावी लागली होती. गेल्या काही वर्षांपासून राज्यात कापूस बियाणे विक्रीकरिता पॅटर्न या आनुषंगिक निश्चित करण्यात आला आहे. त्याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची मदत घेण्यात आली. संस्थेच्या शिफारसीनुसारच दरवर्षी २५ मे पासून कापूस बियाणे विक्रीबाबत ठरले. १५ जूनपासून शेतकऱ्यांनी लागवड करावी, असेही शिफारशीत आहे. परंतु यावेळी लॉकडाऊनमुळे बियाणे वाहतूक प्रभावित झाल्यास बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची झुंबड उडेल, अशी भिती होती. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा यामुळे उडणार होता. परिणामी कृषी विभागाकडून बियाणे विक्रीचे ठरले होते. बियाणे विक्रीनंतर कृषी विभाग शेतकऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना १५ जूनपर्यंत लागवडीपासून परावृत्त करणार होता. परंतु ही बाब तितकीशी सोपी नसल्याने अखेर बियाणे विक्रीच्या निर्णयापासून कृषी विभागाने माघार घेतली आहे.