नाशिक : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरु असल्याने गोर गरीब व निराधार नागरिकांना आपल्या शेतातील एक एकरहून अधिक गहू वाटप करून समाजापुढे आदर्श ठेवणारे नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथील युवा शेतकरी दत्ता रामराव पाटील यांचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत आभार मानले आहे.
देशभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कुठलाही गोरगरीब, शेतकरी, मजूर, बेघर, विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष प्रयत्न करत असून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चोवीस तास मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडविले जात आहे. अशातच शासना सोबतच आपणही आपले कर्तव्य समजून सामाजिक भान ठेवत नाशिक जिल्ह्यातील युवा शेतकरी दत्ता रामराव पाटील यांनी निराधार कुटुंबाना आपल्या शेतातील गहू मोफत उपलब्ध करून दिला. दत्ता रामराव पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे जो आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. याबाबत भुजबळ यांनी दत्ता रामराव पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करत त्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करून आभार मानले.
सोर्स : महान्यूज